डोंबिवली ( शंकर जाधव ) नोव्हेंबर महिन्यात निवृत्ती वेतन धारकांना हयातीच्या दाखल्यासाठी बँकांमध्ये लांबच लांब रांगा लागतात. बँकांमध्ये तासंतास लाईनीत उभे राहून निवृत्ती वेतन सुरु रहाण्यासाठी हयातीचा दाखला मिळवणे हे निवृत्ती वेतन धारकांसाठी आणि ८० वर्षाच्या वरील वयोवृध्दांसाठी डोकेदुखीचे ठरत आहे. यासाठी टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पुढाकार घेतला.वयोवृध्द निवृत्ती वेतन धारकांची हिच अडचण बघून टिळकनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने मागिल वर्षापासून मंडळाच्या कार्यालयात निवृत्ती वेतन धारकांसाठी आँनलाईन जीवनप्रमाण म्हणजेच हयातीचा दाखला मिळवून देण्यासाठी विनामूल्य शिबिर आयोजित करण्यासाठी सुरुवात केली. मागिल वर्षाप्रमाणे यावर्षीही या शिबिराला अंदाजे २२५ निवृत्ती वेतन धारकांचा उदंड प्रतिसाद लाभला. तसेच १५ ते २० आजारी निवृत्ती वेतन धारकांचा घरी जाऊन आँनलाईन हयातीचा दाखला करण्यात आला.निवृत्ती वेतन धारकांना आँनलाईन जीवन प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी इंडियन बँकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या श्री माधव मराठे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे मंडळाचे अध्यक्ष सुशील भावे म्हणाले. शक्य झाल्यास अजून एखादे शिबिरही घेण्याचा मानस सुशील भावे यांनी बोलून दाखवला.