डोंबिवली (शंकर जाधव)
आपल्याला कर्ज हवे असेल तर आपण थेट बँकेशी संपर्क साधतो. मात्र कर्ज काढून देतो असा एखादा फोन आला तर बँकेशी संपर्क न साधता त्याच्यावर विश्वास ठेऊन काही फसतात. लाख रुपयांचा चुना लागल्यावर पोलीस ठाण्यात धाव घेतात. डोंबिवलीतील एका बँकेच्या खातेदाराला फोन करुन कर्ज देतो असे सांगून प्रोसेसिंग फी भरण्यासाठी तब्बल सात लाख रुपये मागितले. पैसे भरल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच खातेदाराने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. याप्रकरणी मानपाडा पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड राज्यातून असे फोन येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, नमन संजय गुप्ता ( २२, रा. दिल्ली ), आकाशकुमार सुनील चंद्वानी ( २८, रा.दिल्ली ) आणि रिशी दीपककुमार सिंग ( २८, रा. दिल्ली ) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. अटक झालेल्या आरोपींकडून पोलिसांनी ७,३४,५०० रुपये, ५ मोबाईल फोन , एटीएम कार्ड जप्त केले. या प्रकरणी अनिल आव्हाड यांच्या फिर्यादिवरून मानपाडा पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आव्हाड हे रूपये घेण्यासाठी अनेक बँकेत फेऱ्या मारत होते. आव्हाड यांना २२ सप्टेबरला आर.के.शर्मा या नावाने फोन आला. १० लाख रुपये कर्ज मंजूर करून देतो असे सांगत मेसेज करत होता. कर्ज हवे असल्यास ३० हजार रुपये प्रोसेसिंग फी म्हणून भरले. आणखी पैसे भरावे लागतील असे आव्हाड यांना वांरवार फोन आल्यावर आव्हाड ह्यांनी वेगवेगळ्या खात्यावर ७,३४,००० रुपये भरले. आणखी एक लाख रुपये भरण्यास आव्हाड यांना फोन आल्यावर यात काही गौडबंगाल असल्याचा संशय आल्यावर आव्हाड यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ज्या बँकेच्या खात्यात आव्हाड यांनी पैसे भरले होते त्या बँकेशी पोलिसांनी संपर्क करून ते अकांऊट सील करण्यासाठी सांगितले. अकांऊट सील झाल्यावर अकांऊटवर असलेल्या पत्याची खात्री करण्यासाठी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी व अंमलदार हे दिल्लीत गेले. दिल्लीत शोध घेतल्यावर आरोपी नमन संजय गुप्ता याला हिमाचल प्रदेश येथील शिमला येथून अटक केली.
संजयची चौकशी केली असता त्याचे साथीदार हे नोयडा आणि दिल्ली येथे असल्याचे सांगितले. पोलिसांनी दिल्लीतून आकाशला आणि उत्तरप्रदेश येथून दीपकसिंगला बेड्या ठोकल्या. या आरोपींनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अनेक बँकेत खाते उघडले होते. उत्तरप्रदेश, बिहार, झारखंड आणि पुणे येथील नागरिकांना कर्ज देतो असे फोन करून प्रोसेसिंग फी म्हणून एक लाख रुपये बनावट खात्यात टाकण्यास सांगितले जायचे. सदरची कारवाई अपर पोलीस आयुक्त दत्तायत्र शिंदे,पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, सहायक पोलीस आयुक्त सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलीस ठाण्याचे वपोनी शेखर बागडे, पोलीस निरीक्षक ( प्रशासन ) सुरेश मदने, सपोनि अविनाश वनवे सुनील तारमळे, पोलीस हवालदार सुशांत तांबे, सुनील पवार, पोलीस नाईक भीमराव शेळके, प्रवीण किनरे, पोलीस शिपाई बालाजी गरुड, संतोष वायकर या पथकानी केली.