31 C
Mumbai
Thursday, May 4, 2023
Homeवेलफेयरकोणता झेंडा घेऊ हाती ? हा प्रश्न कामगाराला कायम का पडतो ?

कोणता झेंडा घेऊ हाती ? हा प्रश्न कामगाराला कायम का पडतो ?

1 मे हा महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन म्हणून ओळखला जातो. याचा इतिहास बघता 21 एप्रिल 856 रोजी दीर्घ लढ्यानंतर ऑस्ट्रेलियन कामगारांना त्यांचा हक्क मिळाला 15 तासाच्या च्या दिवसाऐवजी आठ तासाचा दिवस ही ही त्यांची मागणी या दिवशी पूर्ण झाली यापासूनच प्रेरणा घेत एक मे 1886 रोजी अमेरिकेतल्या कामगार संघटनांनी कामासाठी आठ तासाची मागणी केली अनेक वर्षांच्या रक्तरंजित लढ्यानंतर एक मे 1980 रोजी हे कामगारांचे आंदोलन यशस्वी झाले, योग्य पगार चांगली वागणूक पगारी सुट्टी आणि आठ तास काम या मागण्या मान्य झाल्या. तेव्हापासून बऱ्याच देशांनी एक मे हा कामगार दिवस म्हणून साजरा करायचे मान्य केले. भारतामध्ये याचा प्रारंभ लेबर किसान पार्टीने एक मे 1923 रोजी केला. पहिल्यांदाच लाल झेंडा हे कामगार दिनाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी वापरण्यात आला. पण सध्याची परिस्थिती बघता या संघर्षाची सध्याच्या कामगार वर्गाला फारशी कल्पना नाही. त्यामुळे आता सध्या हा कामगार दिन फक्त एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा केला जातो याची फार खंत वाटते. गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या कामगार वर्गाला आपण नक्की आपल्या हक्कांसाठी कोणाकडे जायचे हा संभ्रम सध्या सर्व दूर दिसतो.

१ मे ह्या कामगार दिनाचे इतर सर्व दिनाप्रमाणेच आता फक्त एक सण म्हणून महत्त्व राहिलेले आहे. जसे महिला दिन आता फक्त उत्सव राहिला आहे तसेच कामगार दिन हा सुद्धा फक्त एक सुट्टीचा दिवस इतकेच त्याचे अस्तित्व राहिलेले आहे. कधीतरी कामाचे तास आठ तासापर्यंतच मर्यादित असावे यासाठी अमेरिकेत झालेला लढा, आता मला नाही वाटतं, कुठल्याही कामगाराला याबद्दल काही माहितीही असेल. भारतापुरता बोलायचं झालं तर कामगार आणि मालक यांच्यातली दरी फारच मोठी आहे. त्यांच्या मधला जो एक दुवा असतो जो युनियन लीडर म्हणून काम करतो ,तो ९९ टक्के वेळा स्वतःच्या स्वार्थापुरताच कार्यरत असतो. त्यामुळे स्वतःचे आणि आपल्या जवळच्या व्यक्तींचे प्रमोशन, बदल्या किंवा त्यांच्या इतर केसेस दाबून टाकायला मॅनेजमेंटला भाग पाडणे, ह्या पलीकडे फारसे काही काम करताना तो दिसत नाही.

मॅनेजमेंट जी पगार वाढ आपसूकच देणार असते, त्याला संपाचे स्वरूप देऊन ती पगार वाढ आपण कशी मिळवून दाखवली आहे हे मधनं मधनं करून दाखवले की युनियन लिडरशिप अबाधित राहते. कामाचे ठरलेले तास हा विषय तर भारतामध्ये आता हळूहळू कालबाह्य व्हायला लागला आहे. बँकेतल्या कर्मचाऱ्यां सकट, प्रायव्हेट कंपनी असू दे, किंवा सरकारी कंपनी असू दे ,दररोज ठरल्यापेक्षा तिन चार तास अधिक काम करणे हे अगदी रुटीन झालेले आहे. उलट वेळेवर घरी जाणारा माणूस हा मालकाच्या रोषाला पात्र ठरतो. स्वतःच्या हक्काच्या रजा मिळवणे ही सुद्धा एक मोठी कठीण बाब होऊन बसते. कुठल्याच कामगाराला आपल्याबद्दलचे नक्की सर्विस रुल्स काय आहेत हे कधीही कळत नाही .जे काही त्याच्यापर्यंत झिरपते, ते तुकड्या तुकड्याने कधी एच आर मॅनेजर किंवा कधी युनियन लिडर तर्फे येत असते .त्यामुळे त्याला मालका शिवाय एच.आर मॅनेजर आणि युनियन लीडरची मर्जी राखणे भाग असते.

भारतातल्या प्रचंड लोकसंख्येमुळे आणि त्यामुळेच उपलब्ध असलेल्या मुबलक प्रमाणातल्या मजूर वर्गामुळे, मालक वर्गाला अशी दादागिरी करणे सहज शक्य होते. नोकरी मिळवणेच जिथे अत्यंत कठीण झाले आहे ,तेथे नियमाप्रमाणे काम करण्याचा हक्क मागण्या इतकी परिस्थिती मजूर वर्गाकडे नाही. याउलट परदेशामध्ये कामाच्या वेळेनंतर ऑफिसचे फोन कोणी उचलत नाही. तसेच शनिवार रविवार हे स्वतःचे स्वतःच्या आनंदा करता असतात, हे तिथे सर्व मान्य आहे. या उलट आपल्याकडे सुट्टीच्या दिवशी ही कामावर बोलवण्यात मालक वर्गालाही काही अडचण येत नाही. कारण मजूर वर्ग थोड्याशा ओव्हरटाइम करता या सर्वाला तयारच असतो. ही परिस्थिती तेव्हाच बदलेल जेव्हा मजूर वर्ग जरा आजूबाजूच्या जगात काय चालले आहे हे डोळस नजरेने बघून स्वतः स्वतःच्या हक्कासाठी जागरूक होईल तोपर्यंत हे पिळवणूक अशीच चालू राहणार आणि मजूर वर्गाला कोणता झेंडा हाती घेऊ हा संभ्रम कायम पडत राहणार.

-उषा मजिठीया

3 COMMENTS

  1. अगदी खरे आहे. अगदी टोकदार आणि थेट मुद्द्याला हात घातलेला आहे. प्रत्येकाला रिलेट होणारे आर्टिकलं. Thankyou mam

  2. अगदी खरे आहे.
    अतिशय टोकदार आणि थेट मुद्दे मांडलेले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »