डोंबिवली ( शंकर जाधव ) डोंबिवली पश्चिमेकडील महात्मा फुले रोड येथील जाधववाडीत भाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ उपाध्यक्ष दिनेश जाधव यांच्या माध्यमातून डोंबिवलीचा मानाचा जाधव वाडीचा महाराजाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. जाधव वाडीत हा उत्सव 1992 पासून सुरु करण्यात आला असून यावर्षी जाधवाडीचा महाराजा उत्सवाचे 31 वर्ष आहे. बाप्पाच्या आगमनाचा सोहळा मोठा धूमधडाक्यात होतो. यावेळी विभागातील डोंबिवलीकर मोठ्या संख्येने यामध्ये सहभागी होतात. लेझीम पथक, बँड आणि पुणेरी ढोल यांच्या गजरात बाप्पा विराजमान होतो. गणेश चतुर्थी ते अनंतचतुर्दशी असे दहा दिवस जाधववाडीत देखावा आणि बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी पहाटेपर्यंत भक्तांची रांग लागलेली पहायला मिळते. प्रत्येक वर्षी विशेष विषय घेऊन सजावट करण्यात येते. यावर्षी महालात बाप्पा विराजमान झाले आहेत. या उत्सवा दरम्यान नागरिकांसाठी आरोग्य शिबिर राबवण्यात येत असून यामध्ये मोफत डोळे तपासणी आणि आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.