कल्याण ( शंकर जाधव ) खड्डयामध्ये दुचाकी आदळली. दुचाकीस्वार महिला थेट टँकरच्या मागच्या चाकाखाली आल्याने अपघाती मृत्यू झाल्याची घटना कल्याण पश्चिमेतील शहाड रेल्वे उड्डाणपूलावर आज दुपारी घडली आहे. मृत महिलेचे नाव कविता प्रशांत म्हात्रे असे आहे. ती एका पेट्रोल पंपावर कामाला होती. या प्रकरणाचा तपास कल्याण महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत.
कविता प्रशांत म्हात्रे ही 40 वर्षीय महिला म्हारळ परिसरात राहते. कविता ही कल्याण पूर्व परिसरातील टाटा नाका परिसरातील एका पेट्रोप पंपावर कामाला होती. आज दुपारी ती म्हारळ येथील घरातून दुचाकीवरुन कामावर जाण्यासाठी निघाली. तिची दुचाकी शहाड पूलावरुन आदळली. ती खाली पडली. त्याच रस्त्याने तिच्या मागून येणा:या टँकरच्या मागच्या चाकाखाली सापडून तिचा जागीच मृत्यू झाला. या पूलावर खडडा आहे. खड्डय़ाच्या बाजूला माती साचली आहे. या खड्डय़ामुळेच हा अपघात झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र या परिसरातील सीसीटीव्हीच्या सहाय्याने पोलिस या घटनेचा तपास करीत आहे. सीसीटीव्ही फूटेज पाहूनच नक्की हा अपघात कशामुळे झाला आहे. या दुदैवी घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. घटना घडल्याची माहिती मिळताच घटनास्थळी कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्याचे पोलिसांनी धाव घेतली. महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी महापालिकेच्या रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.