डोंबिवली ( शंकर जाधव ) कल्याण पश्चिम व पालघर लोकसभा क्षेत्रातील रेल्वेच्या विविध प्रश्नांसाठी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडीचे प्रदेश संयोजक तथा माजी आमदार नरेंद्र पवार यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांची मुंबई येथील सह्याद्री विश्रामगृहात भेट घेऊन निवेदने देऊन चर्चा केली.
वाशिंद शहर पूर्व पश्चिम रेल्वे पादचारी पुलाचे काम रेल्वे विभागाने मंजूर केले आहे, मात्र कामाची सुरुवात झाली नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत आहे, त्या विषयात संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन सदरचे बांधकाम गतीने सुरू करण्याची मागणी नरेंद्र पवार यांनी केली, तसेच त्या ठिकाणी असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे उड्डाणपूलाच्या मार्गाच्या गर्डर कामाकरिता रेल्वे सुरक्षा परवानगीही मागण्यात आली. तसेच कल्याण ते नाशिक रोड व कल्याण ते पुणे मेमू रेल्वे कार्यान्वित करण्याची मागणीही केली. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे या या ठिकाणावर रेल्वे बंद करण्यात आल्या होत्या, तथापि यामुळे अनेक शेतकरी आणि प्रवाशांची गैरसोय होत आहे, सध्या कोरोना पूर्णतः आटोक्यात आला असल्याने सदरच्या गाड्या कार्यान्वित करण्याची मागणीही माजी आमदार नरेंद्र पवार यांनी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांना केली.
कल्याण पूर्व येथील रेल्वेच्या जमिनीवरील अनेक कुटुंबांना घर खाली करण्याच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत मात्र ती कुटुंबे गेली 30-40 वर्षे त्या ठिकाणी राहत आहेत, त्यांना अचानक बेघर करण्याऐवजी त्यातून मार्ग काढण्यासाठी रेल्वे विभाग आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांची बैठक लावण्याची मागणी नरेंद्र पवार यांनी या दरम्यान रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांच्याकडे केली.या सर्व विषयांवर तातडीने मार्ग काढत सर्व विषय मार्गी लावण्याचे आश्वासन रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी दिले असल्याचे माजी आमदार पवार यांनी सांगितले.