जप्तीची नोटीस रद्द
डोंबिवली ( शंकर जाधव ):- १ जून २०१५ रोजी २७ गावे कल्याण –डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट झाली. पण गावतील महत्वाचा प्रश्न मालमत्ता करबाबत गावकरी नाराज आहेत.१० पतीने कर लावल्याने २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीने मालमत्ता कर भरू नका असे आवाहन केले होते. स्वतंत्र नगरपालिकेची मागणी पूर्ण करण्यासाठी समितीचा संघर्ष
सुरु आहे.शिवसेनेचे माजी नगसेवक दिपेश म्हात्रे यांसह संघर्ष समितीचे पदाधिकारी यांनी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन आपल्या मागण्या समोर ठेवल्या. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी समितीचे म्हणणे ऐकूण संबधित अधिकार्यांना निर्देश दिले. याबाबत समिती स्थापन करून मालमत्ता कराबाबत जप्तीची नोटीस रद्द करा आणि कर कमी करण्याबाबत तात्काळ अहवाल सादर करा असे निर्देश देण्यात आले. त्यामुळे अनेक वर्ष वाढीव मालमत्ता कर शिंदे-फडणवीस सरकारमध्ये कमी होण्याची शक्यता असल्याने समितीसह गावकरी आनंदी आहेत.

मुख्यमंत्री शिंदे यांच्या बरोबर पार पडलेल्या बैठकीत खासदार डॉ श्रीकांत शिंदे, पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे , शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम, २७ गाव सर्व पक्षीय संघर्ष समितीचे अध्यक्ष गंगाराम शेलार, उपाध्यक्ष गुलाब वझे, चंद्रकांत पाटील, गजानन पाटील, गजानन मंगरूळकर,ह.भ.प.चेतन महाराज यांसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. बैठकीत झालेल्या निर्णयाबाबत माहिती देण्यासाठी बुधवारी डोंबिवलीत पत्रकार परिषद घेण्यात आली होती.यावेळी उपाध्यक्ष वझे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांना २७ गावातील वाढीव मालमत्ता कराबाबत माहिती दिली. प्रशासन मालमता कर कमी करत असेल तर गावकरी कर भरण्यास तयार आहेत.यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, २७ गावातील मालमत्ता कराबाबत प्रशासानाकडून पाठविण्यात आलेल्या जप्तीच्या नोटीसवर कारवाई करू नये. २७ गावातील मालमत्ताकराबाबत सर्वकष धोरण ठरविण्याबाबत सर्वेक्षण करा , आवश्यक असल्यास समिती स्थापन करा असे निर्देश दिल्याचे सांगितले.
यावेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक दिपेश म्हात्रे म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे यांच्या सकारात्मक निर्णयावर समितीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ मंडळी खुश आहेत. विशेष म्हणजे मालमता कराबाबत गावकरी चिंतेत असल्याने जनतेच्या सरकारने हे गावकऱ्यांना अपेक्षित असा निर्णय घेतला.मुख्यमंत्री शिंदे हे विकासाचा मार्ग नक्की काढतील असा विश्वास देखील म्हात्रे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.डोंबिवलीत ह.भ.प सावळाराम महाराज यांचे भव्य स्मारक करण्याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याचे ह.भ.प. चेतन महाराज यांनी यावेळी सांगितले.