ठाकुर्ली (शंकर जाधव)
ठाकुर्ली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरात रस्त्याच्या कडेला नो पार्किंग मध्ये उभ्या केलेल्या दुचाकींवर वाहतूक विभागाकडून ऑनलाईन दंडात्मक कारवाई करण्यात आली. २६ ते २८ असे तीन दिवस वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईत १०५ दुचाकींवर कारवाई झाली असून ७० हजार ५०० रुपये दंड आकारण्यात आला आहे. नो पार्किंग मध्ये पार्क केलेल्या दुचाकीना प्रत्येकी ५०० रुपये तर दंड आकारूनही पुन्हा त्याच जागी दुचाकी पार्क केलेल्या १७ दुचाकींवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.
या दुचाकींना प्रत्येकी १५०० रुपये दंड भरावा लागणार आहे. दंड आकारलेल्या दुचाकी मालकांनी अद्याप दंडाची रक्कम भरली नसून नाकाबंदी दरम्यान या दुचाकी वाहतूक पोलिसांनी पकडल्यास त्यांच्याकडून दंड वसूल केला जाणार आहे. दरम्यान ठाकुर्ली पूर्वेकडील स्टेशन बाहेरील परिसरात दुचाकी पार्क करताना नियमांनुसार पार्किंग आहे का ? वाहतुकीचे नियम मोडत तर नाही ना ? याकडे दुचाकीस्वारांनी लक्ष देणे आवश्यक आहे. तर वाहतुकी पोलिसांकडून कडक कारवाई सुरू झाल्याने रस्त्याच्या कडेला दुचाकी पार्क होत नसल्याचे दिसते. त्यामुळे वाहतूक कोंडी होत नाही असे जागरूक नागरिक मनोज गिरी यांनी सांगितले.