28 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-Dombivliडोंबिवलीत ‘सोलार रुफ टॉप’ योजनेच्या जनजागृतीसाठी रॅली, महावितरणचे २०० अभियंते व कर्मचारी...

डोंबिवलीत ‘सोलार रुफ टॉप’ योजनेच्या जनजागृतीसाठी रॅली, महावितरणचे २०० अभियंते व कर्मचारी सहभागी

डोंबिवली (शंकर जाधव)

घरगुती ग्राहकांच्या वीजबिलात बचत व पर्यावरण संरक्षणात महत्वपूर्ण अशा केंद्र सरकार पुरस्कृत ‘सोलार रुफ टॉप’ योजनेच्या जनजागृतीसाठी महावितरणच्या डोंबिवली विभागाकडून बुधवारी बाईक रॅली काढण्यात आली. योजनेच्या माध्यमातून घराच्या छतावर सवलतीच्या दरात सौरऊर्जा प्रकल्प उभारणीबाबत माहिती देऊन अधिकाधिक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन या रॅलीमार्फत करण्यात आले.

मुख्य अभियंता धनंजय औंढेकर व अधीक्षक अभियंता दीपक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता धनराज बिक्कड यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतर डोंबिवली विभाग कार्यालयातून रॅलीची सुरूवात झाली. घरडा सर्कल, टिळक चौक, चार रस्ता, कोपर पूल, व्दारका हॉटेल, सम्राट चौक या मार्गे जात रेतीबंदर येथील आनंदनगर उपकेंद्रात रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत डोंबिवली विभागातील सर्व महिला व पुरुष अभियंते, तांत्रिक कर्मचारी, जनमित्र असे सुमारे २०० जण सहभागी झाले होते. या योजनेंतर्गत केंद्र सरकारकडून घरगुती वर्गवारीतील ग्राहकांना किमान एक किलोवॅट क्षमतेची छतावरील सौरऊर्जा निर्मिती यंत्रणा बसवण्यासाठी अनुदान देण्यात येते.

यात घरगुती ग्राहकांसाठी १ ते ३ किलोवॅटपर्यंत ४० टक्के आणि ३ किलोवॅटपेक्षा अधिक ते १० किलोवॅटपर्यंत २० टक्के अनुदान देण्यात येते. तसेच सामुहिक वापरासाठी ५०० किलोवॅटपर्यंत परंतु प्रत्येक घरासाठी १० किलोवॅट मर्यादेसह गृहनिर्माण रहिवासी संस्था (Group Housing Society) व निवासी कल्याणकारी संघटना (Residential Welfare Association) ग्राहकांना २० टक्के अनुदानाची तरतूद आहे. डोंबिवली विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंते प्रमोद पाटील, गजानन पाटील, विनायक बुधवंत, पराग उके, सुगत लबडे यांनी रॅलीसाठी परिश्रम घेतले. तर रॅलीमुळे नागरिकांना अडचण येऊ नये, यासाठी वाहतूक पोलिसांनी महावितरणला मोलाचे सहकार्य केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »