31.9 C
Mumbai
Sunday, May 14, 2023
Homeवेलफेयरमदर्स डे एक नवा दृष्टिकोन.

मदर्स डे एक नवा दृष्टिकोन.

मे महिन्यातला दुसरा रविवार हा मदर्स डे केव्हा मातृदिन म्हणून सर्व मान्य झालेला आहे. ऍना जारव्हीस या अमेरिकन ऍक्टिव्हिस्टने ह्या दिवसाची 1907 मध्ये सुरुवात केली. 1914 मध्ये अमेरिकेच्या 28व्या प्रेसिडेंट श्री वड्रो विल्सन यांनी एक जाहीरनामा सही करून मे महिन्यातल्या दुसऱ्या रविवारला मदर्स डे म्हणून मान्यता दिली. तेंव्हापासून हा दिवस अमेरिकेत सुट्टीचा मानल्या जातो आणि इतर देशांमध्ये सुद्धा याला मान्यता मिळाली. आईच्या त्यागाला तिच्या प्रेमाला एक वंदना म्हणून हा दिवस साजरा केला जातो.
पण आता याबद्दलचा दृष्टिकोन थोडा बदलायची वेळ आली आहे. आई नावाच्या व्यक्तीला एखादा दिवस सलाम करून इतर पूर्ण आयुष्यभर तिच्या आकांक्षा, तिच्या क्षमता, या पूर्णपणे कौटुंबिक जबाबदारीत दाबणे कितपत योग्य आहे? सतत प्रेमळ समजूतदार त्यागी आणि फक्त कुटुंबाचा विचार करणारी अशी एक स्त्री म्हणून आईकडे बघण्याऐवजी तिलाही आता तिच्या क्षमतांचा तिच्या आवडीनिवडीचा पूर्ण विचार आणि वापर करू देण्याची मुभा देण्याचे जर ठरवले तर तो खरा मातृदिन किंवा मदर्स डे ठरेल. स्त्री पुरुष समानता हा विषय कितीही आवडीने बोलला गेला असेल तरीसुद्धा प्रत्यक्षात स्त्रीवर, जर ती घराबाहेर पडली मग ते नोकरीसाठी असू दे किंवा स्वतःच्या व्यवसायाकरता असू दे ,तिच्यावर दोन पूर्णवेळाच्या कामांची जबाबदारी पडते. म्हणजे घरातले सगळे काम, मुलांचा संगोपन, पाहुण्यांचे उठ-बस, सगळ्यांचे आजारपण आणि हे करून जर काही वेळ उरला तर आपल्या नोकरीत स्वतःला सिद्ध करण्यासाठी प्रमोशन घेण्यासाठी वेळ आणि शक्ती काढणे, या कुतरओढीला कंटाळूनच स्त्रिया शेवटी स्वतःच्या आवडीनिवडी ,स्वतःचे करिअर हे बाजूला ठेवतात आणि मनात असो किंवा नसो कुटुंबासाठी सर्व आयुष्य वेचतात. संवर्धन, संगोपन हा स्त्रियांचा उपजत गुण आहे. त्यामुळे मुलांची जबाबदारी त्या नेहमीच आवडीने आणि स्वेच्छेने घेतात. पण याबरोबर जर थोडी मानसिकता बदलली आणि कामाच्या ठिकाणच्या परिस्थितीत जर एका आईला तिच्या बाळासकट सामावून घेण्याची व्यवस्था झाली तर आत्ता जो त्रास होत आहे तो कुठल्याच आईंना होणार नाही. उदाहरणार्थ बाळाचे संगोपन हे फक्त आईची जबाबदारी नसून वडिलांनीही ती तितक्याच समप्रमाणात उचलली पाहिजे. कामाच्या ठिकाणी मुलांसाठी पाळणाघ,र तिला कामाच्या लवचिक वेळा जर मिळाल्या तर मुलांच्या संगोपन काळात तिला फार मोठा आधार मिळून तिही
तिचे करिअर आणि आवडी सांभाळू शकेल. बाळ लहान असताना घरातून काम करण्याची मुभा किंवा ऑफिसमधलं पाळणाघर आणि तिथे जाण्यासाठी वाहनांची व्यवस्था हे जर का ऑफिस थोडेफार पैसे घेऊन सुद्धा करू शकले तरी अनेक स्त्रियांचे अनेक प्रश्न सुटतील आणि केवळ आईपणामुळे जे त्यांच्या क्षमतांचे खच्चीकरण होत आहे ते थांबेल.
सामाजिक मानसिकतेत सुद्धा बराच बदल होण्याची गरज आहे. एखाद्या आईला करिअरची आवड असणे म्हणजे काहीतरी मोठे पाप ती करते आहे अशी जी धारणा आहे ती बदलली पाहिजे. असे न झाल्यास सध्याच्या पिढीत जो विचार आता दिसतो आहे तो हळूहळू सर्वत्र पसरेल. म्हणजे लग्नच नको आणि लग्न केल्यास मुले तर नकोच नको असा विचार सध्याच्या तरुण मुलीत रुजत आहे. आजूबाजूला सगळ्यांनाच हे आता जाणवत आहे. याचे कारणच हे आहे की आता तरुण मुलींना आदर्श माता होण्याबरोबरच स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि त्यांच्या करिअरची जडणघडण ही पण तेवढीच महत्त्वाची वाटते आणि त्यामुळेच त्या आड येणारे मातृत्व त्या नाकारायला लागलेल्या आहेत. हे जर वेळीच थांबवायचे असेल तर एका दिवसाचे मदर्स डे सेलिब्रेट न करता आई ह्या व्यक्तीला व्यक्ती म्हणून जगण्याची मुभा आणि मदत करण्याचे ठरवूया म्हणजे खऱ्या अर्थाने मदर्स डे सेलिब्रेट केला असे होईल.

  • उषा मजेठीया
    लेखिका आणि
    सामाजिक कार्यकर्त्यां
    डोंबिवली
    +91 96196 80102

Follow us –
http://ushamajithia.com/

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »