डोंबिवली (शंकर जाधव)
कल्याण पूर्व विभागातील हाजी मलंग फिडरवर वीजचोरी शोध मोहिम राबवताना काकडवाल गावात महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यासह दहा जणांच्या पथकाना बेदम मारहाण केल्याची घटना बुधवारी ११ तारखेला घडली. मारहाण करणाऱ्या पाच जणांविरोधात रात्री उशिरा हिललाईन पोलिस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या १० व मुंबई पोलीस अधिनियमाच्या विविध ३ कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकाला अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनंता दूधकर असे अटक करणाऱ्यांचे नाव आहे.तर अशोक दूधकर, संतोष दूधकर, जगदीश दूधकर, आणि प्रकाश दूधकर अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. अधिक वीजहानी असलेल्या हाजीमलंग फिडरवर गेल्या तीन महिन्यांपासून वीजचोरी शोधण्यासह सदोष मीटर बदलणे, ग्राहकांच्या तक्रारीच्या निवारणाची व्यापक मोहिम राबवण्यात येत आहे.
वाहतूक पोलीस व रिक्षा चालकांची आरोग्य तपासणी
या मोहिमेंतर्गत बुधवारी काकडवाल गावात सहायक अभियंता रविंद्र नाहिदे यांच्या पथकाने दूधकर यांच्या चार मजली इमारतीला अवघे अडीचशे रुपये वीजबिल येत असल्याने त्यांच्या वीज पुरवठ्याची तपासणी करण्याचा प्रयत्न केला. परंतू तीन महिला कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या पथकाला काम करण्यापासून रोखत दूधकर कुटुंबियाने लाथा-बुक्क्या, लोखंडी सळई, लाकडी काठ्या व पाईपच्या तुकड्याने हल्ला करत पथकातील अभियंता व कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केली. हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर तातडीने घटनास्थळी पोहचलेले कल्याण पूर्व विभागाचे कार्यकारी अभियंता नरेंद्र धवड व कनिष्ठ अभियंता प्रशांत राऊत यानांही दूधकर कुटुंबियांनी मारहाण केली.
दूधकर कुटुंबियांच्या हल्ल्यात कार्यकारी अभियंता धवड यांच्यासह दहा अभियंते, कर्मचारी जखमी झाले.प्राथमिक उपचारानंतर सहायक अभियंता नाहिदे यांच्या फिर्यादीवरून हिललाईन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता धनंजय औंढेकर, कल्याण मंडल दोनचे अधीक्षक अभियंता दिलीप भोळे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, अभियंते, कर्मचारी रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते. मारहाण करणाऱ्यांवर कडक कारवाईसाठी कामगार संघटनाही आक्रमक झाल्या असून महावितरण प्रशासनाकडून कडक कारवाईसाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीराम पडवळ करीत आहेत.
कर्तव्य बजावताना आपला हात गमावलेल्या ट्रॅफिक वॉर्डनला वाहतूक पोलिसांकडून आर्थिक मदत