१ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ‘आधार राष्ट्रीय कौशल्य विकास’ केंद्रातर्फे अभिनय कार्यशाळा – २०२२ चा शुभारंभ डोंबिवली पश्चिम येथील रेती भवन हॉलमध्ये स्वराज्य रक्षक संभाजी या मालिकेतील अनाजीपंत ही भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते महेश कोकाटे, छायांकन दिग्दर्शक मिलिंद पवार, लोकस्वराज्य मालिका/चित्रपट निर्माते प्रशांत खानविलकर, फुलाला सुगंध मातीचा या स्टार प्रवाह वरील मालिकेतील अभिनेत्री भुमिजा पाटील अशा अनेक दिग्गजांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.

या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना अभिनयाच्या प्रकारांसोबतच चित्रपट, मालिका तयार करणे, कलादिग्दर्शन, मेकअप बद्दलची माहिती, ध्वनी, एडिटिंग या सर्व विषयांची माहिती व ज्ञान प्राप्त होणार आहे. या सर्व क्षेत्रातील दिग्गज व्यक्ती व नामांकित अभिनेते या कार्यशाळेत येऊन मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यशाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शनाखाली भविष्यात अनेक संधी उपलब्ध होतील असे प्रशांत खानविलकर यांनी सांगितले. प्रशांत देसाई आणि सुमेध जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच आधार इंडियाचे (Aadhar India) महाव्यवस्थापक डॉ.अमित दुखंडे हे या कार्यक्रमाचे आयोजक आणि सर्वेसर्वा आहेत.