डोंबिवली (शंकर जाधव)
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व पर्यावरण प्रेमींनी ‘आरे जंगल वाचावे’ याकरता मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानासमोर निषेध धरणे आंदोलन केले. आंदोलनात सहभागी झालेल्या 30 ते 35 जणांना ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतले.
ऑक्टोबर 2019 मध्ये मुंबई मेट्रोच्या कारशेडसाठी आरे जंगलाची निवड करण्यात आली. दिनांक 4 ऑक्टोबर 2019 रोजी पर्यावरणप्रेमींच्या आंदोलनानंतरही रात्रीच्या अंधारात हज़ारो वृक्षांची अमानुषपणे कत्तल करण्यात आली. वृक्ष वाचविण्यासाठी आंदोलन करीत होते. या आंदोलनाची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरही घेण्यात आली. त्यावेळी एकनाथ शिंदे हे महाविकास आघाडी सरकार मध्ये नगरविकास मंत्री होते. सरकारतर्फे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलून आरे हे जंगल म्हणून घोषित केले. मुंबई व महाराष्ट्रातल्या पर्यावरणप्रेमी जनतेनी या निर्णयाचे स्वागत केले.
आता एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री झाल्यावर आरे जंगलातील मुंबई मेट्रोच्या कारशेडची जागा बदलली जाणार नाही ही घोषणा केली. या घोषणेमुळे मुंबई व महाराष्ट्रातील जनता व पर्यावरणप्रेमी फार नाराज झाले आहेत. पर्यावरण व हवामान ढासळत असताना अश्या निर्णयाच्या विरोधात आणि आरेचे जंगल वाचावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागातर्फे हे निषेध धरणे आंदोलन करण्यात आल्याचे प्रदेश सरचिटणीस वर्षा शिखरे यांनी सांगितले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या किसान सेलचे अध्यक्ष पराग पष्टे, पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष समीर सुभाष वर्तक यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या पर्यावरण विभागाचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय पाटील, प्रदेश सरचिटणीस वर्षा शिखरे, अभिजित घाग, अम्मार पटेल, प्रदेश सचिव आमिर देशमुख, विलास साळवे, पर्यावरण विभागाचे जिल्हाध्यक्ष विलास साळवे, ठाणे शहर मनोज डाकवे, ठाणे ग्रामीण रामचंद्र जोशी, वसई विरार जिल्हाध्यक्ष डेरीक फुरताडो व कार्याध्यक्ष संदीप किणी, उपाध्यक्ष खान, सरचिटणीस आमिर सय्यद, कल्याण डोंबिवलीचे रीना खांडेकर, भिवंडीचे नौशाद अन्सारी, कोल्हापूरचे प्रदीप डाखरे, पनवेलचे सुरेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते दर्शन राऊत, पवन भोईर आणि अनिल जाधव उपस्थित होते. ठाणे ग्रामीण जिल्हा सरचिटणीस रविंद्र परटोले, शहापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महेश धानके, राष्ट्रीय फेरीवाला संघाचे महासचिव मॅकेन्झी डाबरे, युवा संस्थेचे राजू भिसे, कामगार संघटनेचे अरनॉल्ड करवालो तसेच पर्यावरण विभागाचे अनेक कार्यकर्ते आणि असंख्य पर्यावरण प्रेमी कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झालेले होते.