भारतीय रेल्वेने (Indian Railway) आज मुंबईकरांना एक दिलासादायक बातमी दिली आहे. रेल्वेने आज एसी लोकल (AC Local) च्या तिकीटा बाबत एक मोठी घोषणा केली आहे. रेल्वेने मुंबईकरांसाठी एसी लोकलच्या तिकीट दरांमध्ये थेट ५० टक्क्यांची कपात केली आहे. त्यामुळे आता एसी लोकल चे तिकीट सर्वसामान्यांना परवडेल. रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिलेल्या माहितीनुसार भारतीय रेल्वे बोर्डाने मुंबईमधील एसी लोकलच्या तिकीट दरांमध्ये ५० टक्क्यांची कपात करण्याच्या मागणीला मंजुरी दिली आहे असे सांगण्यात आले.
मुंबईच्या हैराण केलेल्या उन्हामध्ये ही बातमी नक्कीच सर्व प्रवाशांना दिलासा देणारी आहे. राज्यातील उष्णतेच्या लाटेमुळे सर्वच हैराण झालेले आहेत. यात मुंबईकरांचा लोकल प्रवास गार गार व्हावा यासाठी एसी लोकलचे तिकीट दर कमी करून रेल्वेने मुंबईकरांना एक प्रकारचा थंडावाच देण्याचा प्रयत्न केला आहे.
मुंबईची (Mumbai) लाईफ लाईन म्हणजेच लोकल अपग्रेड करत पश्चिम आणि मध्य रेल्वेने एसी लोकल सुरू केली होती, परंतु एसी लोकल चे तिकीट सर्वसामान्यांना परवडणारे नसल्यामुळे अनेक प्रवाशांनी वारंवार तक्रार केली होती. सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर असलेल्या तिकीट दरांमुळे ही एसी लोकल सर्वच प्रवाशांसाठी उपयुक्त नव्हती त्यामुळे एसी लोकल ला हवा तेवढा प्रतिसाद सुद्धा नव्हता. या कारणामुळे एसी लोकलची तिकिटांची किंमत कमी करावी अशी मागणी सुद्धा प्रवासी संघटनांनी केली होती.
रेल्वेच्या वाणिज्य विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार मध्य रेल्वेने सर्वेक्षण करताना एसी लोकल मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांबरोबरच इतर प्रवास करणाऱ्यांचे देखील सर्वेक्षण केले होते. त्यामध्ये सर्वच प्रवाशांनी या एसी तिकिटांची किंमत कमी करण्याची मागणी केली होती. याच बरोबर एसी लोकलच्या फेऱ्या सुद्धा वाढवण्याची मागणी ९५% प्रवाशांनी केली होती. या सर्वांचा विचार करतच रेल्वे प्रशासनाने तिकीटांच्या दरात घट करण्याची घोषणा केली जात आहे.