प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Actor Tunisha Sharma) हिने आज म्हणजेच शनिवारी दुपारी आत्महत्या केली. मालिकेच्या सेटवरच तिने गळफास लावून जीवन संपवल्याची (Sucide)माहिती आहे. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तुनिशा २० वर्षांची होती आणि आतापर्यंत तिने अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. बालकलाकार म्हणून तिने इंडस्ट्रीत तिच्या करिअरची सुरुवात केली.
सोनी सब टीव्हीवरील ‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या मालिकेत तुनिषा मुख्य भूमिकेत होती. तुनिषा शर्माने शनिवारी दुपारी गळफास घेऊन आत्महत्या केली. वसई पूर्वेतील कामण येथील स्टुडिओच्या टॉयलेटमध्ये तिने गळफास लावून घेतला. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ख्रिसमसच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. तुनिषाने आत्महत्या केल्यानंतर सेटवरील लोकांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेले, मात्र वाटेतच तिचा मृत्यू झाला. वालीव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास बर्वे यांनी सांगितले की, तिने नेमकी आत्महत्या का केली आणि आत्महत्या करण्यापूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवली होती का, याचा तपास करत आहोत.
‘अलिबाबा: दास्तान ए काबुल’ या टीव्ही मालिकेत तिने मुख्य भूमिका साकारली होती. सध्या तुनिशा सोनी सब टीव्हीवरील अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेत राजकुमारी मरियमची भूमिका साकारत आहे. तुनिशा ‘फितूर’, ‘बार बार देखो’, ‘कहानी 2: दुर्गा रानी सिंह’, ‘दबंग 3’ यांसारख्या चित्रपटांमध्येही दिसली होती. कलर्स टीव्हीवरील तिची ‘इंटरनेट वाला लव’ ही मालिका लोकांना खूप आवडली होती.