महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे (MNS) अध्यक्ष अमित ठाकरे (Amit Thackrey) आज कल्याण – डोंबिवली (Kalyan – Dombivli) मध्ये दाखल झाले होते. आगामी कल्याण डोंबिवली पालिका निवडणुकीच्या (KDMC Elections) तोंडावर मनसे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, पदाधिकारी आणि यापुढील काळातील पक्षाची रणनीती याविषयी चर्चा करण्यासाठी युवा नेते अमित ठाकरे आज कल्याण डोंबिवली येथे आले होते. खडकपाडा येथील स्प्रींग टाईन हॉटेलमध्ये त्यांच्या बैठका होत होत्या. सकाळी त्यांनी कल्याणमधील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून दुपारी त्यांनी डोंबिवलीतील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधण्याकरता मार्गक्रमण केले.
डोंबिवलीत पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी मराठी शाळा (Marathi Schools) कमी होत आहेत यावर आपले मत व्यक्त करत असतानाच मराठी शाळेचा टक्का घसरू देणार नाही असे आश्वासन दिले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी झाल पाहिजे आणि हा विषय खूप गंभीर असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना राजकीय पाठबळ मिळणे गरजेचे आहे त्यासाठी मनसे विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभी असल्याचा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियाना अंतर्गत विद्यार्थ्याशी संवाद साधण्यासाठी ते डोंबिवलीत आले होते. सर्वेश सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात मनसे नेते तथा आमदार प्रमोद (राजू) पाटील, जिल्हाध्यक्ष प्रकाश भोईर, डोंबिवली शहरअध्यक्ष मनोज घरत, हर्षद पाटील, मनविसे डोंबिवली शहर अध्यक्ष मिलिंद म्हात्रे, अरुण जांभळे, दिपाली पेंडणेकर, उर्मिला तांबे, संदीप म्हात्रे, अवि वालेकर, गणेश कदम आदिसह मनसैनिक उपस्थित होते. स्वामी विवेकानंद शाळा (दत्तनगर) शाळेतील २० गरजू विद्यार्थ्यांची मिलिंद म्हात्रे यांच्यावतीने फी भरली जाणार आहे, या फीच्या रक्कमेचा धनादेश अमित ठाकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना देण्यात आला. तर नेहरू मैदान येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, आयरे गावातील विद्यार्थ्यांना वह्या देण्यात आल्या. तर तकदीर काळण यांनी जिल्हा परिषद शाळेतील तीन हजार विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप कार्यक्रमात करण्यात आले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना अमित ठाकरे यांनी प्रत्येक पक्षाला साडेसाती असते. मनसेची साडेसाती संपली असून तरुण वर्गाने मनसेकडे पाहावे असे सांगितले. मनसेची व्यूहरचना असून लवकरच मनसे महाराष्ट्राची कायापालट करील. युवा नेते आदित्य ठाकरे यांच्या शिवसंपर्क अभियानाबाबत पत्रकारांनी विचारले असता आदित्य ठाकरे यांचे अभियान आता सुरु झाले असून माझे महासंपर्क विद्यार्थी संवाद अभियान सुरु राहणार असल्याचे सांगितले. यावेळी कॉंग्रेस सेलचे जिल्हाध्यक्ष शिबू शेख आणि शिवसेना उपविभागप्रमुख प्रवीण केणे यांनी कार्यकर्त्यांसहित मनसेत जाहीर प्रवेश केला.

भाजपा सारख्या पक्षाला २०१४ साली बहुमत मिळाले. त्यामुळे प्रत्येक पक्षाला उभारणी मिळत असते. मनसे पक्ष जनतेच्या संपर्कात असल्याने मनसेला लवकरच मनसेचे अच्छे दिन येतील असा विश्वास अमित ठाकरे यांनी व्यक्त केला. रस्त्यातील खड्डे हे मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, दिवा ,भिवंडी,अंबरनाथ, बदलापूर येथे आहे. इतकी वर्षे सत्ता उपभोगुन जनतेचे हाल केले. म्हणूनच मनसेची सत्ता जनतेच्या सेवेसाठी असेल असेही अमित ठाकरे म्हणाले. तर ट्रेन मध्ये प्रवास करणाऱ्यांचे हाल होत असताना. मी अनेक वेळेला ट्रेनने आलो आहे. मात्र वेळ वाचवा हे त्यामागील कारण आहे असेही ठाकरे म्हणाले.