डोंबिवली ( शंकर जाधव )
महावितरणच्या कल्याण परिमंडलातील वीजग्राहकांना एप्रिल अथवा मे महिन्याच्या वीजबिलांसोबत अतिरिक्त सुरक्षा ठेव भरण्यासाठी स्वतंत्र बिल देण्यात येत आहे. या अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या रकमेचा वीज ग्राहकांनी भरणा करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम भरण्यास महावितरणकडून कमाल सहा समान मासिक हप्त्यांची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याबाबतचा संदेश सुरक्षा ठेवीच्या बिलावर नमूद करण्यात आला आहे.महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाच्या विद्युत पुरवठा संहिता-२०२१ च्या विनियम १३.१ नुसार वीजग्राहकांकडून सुरक्षा ठेव आकारण्यात येते.
दरवर्षी सुरक्षा ठेवीची पुनर्गणना करण्यात येते व त्यानुसार आर्थिक वर्ष संपल्यानंतर ग्राहकांच्या मागील एका वर्षातील सरासरी वीजवापराच्या आधारे अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम निश्चित करण्यात येते. वीजग्राहकांची सुरक्षा ठेव ही मासिक बिल असेल तेथे सरासरी मासिक बिलाच्या दुप्पट आणि त्रैमासिक असेल तेथे सरासरी त्रैमासिक बिलाच्या दीडपट घेण्याची तरतूद आयोगाकडून करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे विनियम १३.११ नुसार ग्राहकाने भरलेल्या सुरक्षा ठेव रकमेवर रिझर्व्ह बँकेच्या प्रचलीत दरानुसार व्याजाची रक्कम वीजबिलाद्वारे समायोजित करून वीजग्राहकांना अदा करण्यात येते.
कल्याण परिमंडलातील ग्राहकांच्या सुरक्षा ठेवीवर सन २०२१-२२ या वर्षात १९ कोटी ९६ लाख रुपयांचे व्याज मिळाले व हे व्याज मे अथवा जून २०२२ मध्ये ग्राहकांच्या वीजबिलात समायोजित करण्यात आले. तर गतवर्षीच्या व्याजाचा परतावाही आगामी मे अथवा जूनच्या वीजबिलात देण्यात येईल.लघुदाब वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेवीची रक्कम घरबसल्या भरण्यासाठी महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर व महावितरणच्या मोबाईल ॲपवर सुविधा उपलब्ध आहे. वीजग्राहकांनी अतिरिक्त सुरक्षा ठेवीच्या बिलाची रक्कम भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.