29 C
Mumbai
Friday, May 5, 2023
Homeताजी बातमी Assam flood: आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 2 लाख लोक बाधित; IMD रेड...

Assam flood: आसाममध्ये अतिवृष्टीनंतर पुराचा कहर, 2 लाख लोक बाधित; IMD रेड अलर्ट

एकीकडे देशात उष्णतेने थैमान घातले आहे तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक भाग अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे प्रभावित झाले आहेत. आसामच्या बराक व्हॅली आणि दिमा हासाओ जिल्ह्यासह शेजारच्या त्रिपुरा, मिझोराम आणि मणिपूरच्या काही भागांशी रस्ते आणि रेल्वे संपर्क मंगळवारी मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे विस्कळीत झाला. 
आसाम आणि मेघालयमध्ये अनेक ठिकाणी रस्ते आणि रेल्वे रुळ वाहून गेले आहेत. आसामला पुराचा फटका बसला असून आतापर्यंत 20 जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोक प्रभावित झाले आहेत. मुसळधार पावसामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात किमान 11 जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे यंदा ईशान्येकडील राज्य पुराच्या विळख्यात आहे. पुरामुळे नद्यांच्या पाणी पातळीतही हळूहळू वाढ होत आहे.

ईशान्येतील पुरानंतर आतापर्यंत काय परिस्थिती आहे?

अरुणाचल प्रदेशच्या सीमावर्ती राज्यामध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे सोमवारी चार जणांचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी एपी वृत्तसंस्थेला सांगितले. राज्याची राजधानी इटानगरमधील एका लहान टेकडीवरील घर कोसळून अन्य दोघांचा मृत्यू झाला. दुस-या ठिकाणी भूस्खलनामुळे रस्ते बांधणीत गुंतलेल्या दोघांचा मृत्यू झाला.
मोठ्या प्रमाणावर भूस्खलन आणि पाणी साचल्यामुळे राज्यातील डोंगराळ भागात रेल्वे ट्रॅक, पूल आणि रस्ते दळणवळणाचे मोठे नुकसान झाले आहे, ज्यामुळे आसाम, अरुणाचल प्रदेश आणि मेघालयच्या अनेक भागांतील लोकांना समस्या निर्माण झाल्या आहेत.
आसामच्या जिल्ह्यांतील सुमारे 2 लाख लोकांचा उर्वरित राज्यापासून संपर्क तुटला आहे कारण रस्ते आणि पूल भूस्खलनामुळे एकतर बंद झाले आहेत किंवा वाहून गेले आहेत. या भागातील दळणवळण वाहिन्याही बंद करण्यात आल्या आहेत.

राज्यातील एकूण 811 गावांना पुराचा फटका बसला आहे, तर 1,277 घरांचे पूर्ण नुकसान झाले आहे आणि 5,262 घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. पुराचे पाणी घरात घुसल्याने अनेकांना घरे सोडावी लागली आहेत आणि त्यांनी शाळा आणि उंचावरील भागात आश्रय घेतला आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) पुढील तीन दिवस या प्रदेशात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे. यासोबतच हवामान खात्याने बुधवारी आसाममध्ये रेड अलर्ट जारी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »