डोंबिवली (शंकर जाधव)
मध्यप्रदेश येथील नर्मदालयाच्या संस्थापिका भारती ठाकूर (प्रव्राजिका विशुद्धानंदा) यांना राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षण संस्थेचा २४ वा स्वामी विवेकानंद पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, मानपत्र, स्मृतिचिन्ह व रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. स्वामी विवेकानंद दत्तनगर येथील पटांगणात पार पडलेल्या या पुरस्कार सोहळ्यात संस्थेचे सल्लागार व हितचिंतक तसेच सार्वजनिक बांधकाम आणि नागरी पुरवठा मंत्री रवींद्र चव्हाण यांचा सत्कार संस्था अध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी विवेक मासिकाच्या कार्यकारी संपादक अश्विनी मयेकर, माजी मंत्री खासदार जगन्नाथ पाटील तसेच कार्यक्रमाला संस्थेचे आजी व माजी पदाधिकारी, निमंत्रित, मान्यवर, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक, विद्यार्थी उपस्थित होते. सोहळ्यात संस्थापिका भारती ठाकूर म्हणाल्या, नर्मदा काठावरील असंख्य मुलांचे हरवलेले बालपण थोड्या अंशाने का होईना परत मिळवून देण्याचे कार्य गेल्या बारा वर्षात केले. नर्मदा परिक्रमा करताना आलेले विविध अनुभव कथन केले. विद्यार्थी शिकत आहेत परंतु त्यांना लिहिता येत नाही, ही समस्या दूर करण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे, अशी इच्छा बाळगून २००९ या वर्षी मंडलेश्वर पासून जवळ लेपा गावामध्ये आपले कार्य सुरू केल्याचे म्हटले. लेपा गावामध्ये सुरुवातीला १४ मुलं होती तेथे आत्ता ११७ मुलं शिक्षण घेत आहे.
डोंबिवलीच्या टिळकनगर शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलनात सुमारे १३०० माजी विद्यार्थी
नर्मदालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना नि:शुल्क शिक्षण दिले जाते. आदिवासी भागात जाण्यासाठी बस तयार करण्यात आली असून त्या बस मध्ये सर्व प्रकारचे शिक्षण देता येईल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. “सध्या नर्मदालयाच्या माध्यमातून १५ गावातून १७०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत”असेही त्या म्हणाल्या. याप्रसंगी संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या डॉ. रघुनाथ माशेलकर बालवैज्ञानिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये प्राथमिक विभागाचा पुरस्कार विष्णुनगर प्राथमिक मधील विद्यार्थी गजेंद्र साठे याला तर माध्यमिक विभागाचा पुरस्कार अरुणोदय माध्यमिक शाळेचा अथर्व पाटील याला जाहीर करण्यात आला.
शेवंताबाई मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी बांधवांना ब्लॅन्केट वाटप
सत्कारमूर्तींचा परिचय संस्था सदस्य अंकुर आहेर यांनी करून दिला. मानपत्र वाचन स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, विष्णुनगर माध्यमिक शाळेचे शिक्षक डॉ. सुनील पांचाळ यांनी केले. पुरस्काराच्या सुरुवातीला विष्णुनगर शाळेमधील विद्यार्थ्यांनी “वंद्य वंदे हे देवी शारदे ” हे ईशस्तवन तर दत्तनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी ” आनंद सोहळ्याला माधुर्य अमृताचे, गातो विनम्र भावे हे गीत स्वागताचे ” हे स्वागत गीत सादर केले.तर संस्थेच्या चिंध्याचीवाडी येथील आदिवासी आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांनी ” या विश्वाची आम्ही लेकरे” या समूहगीताचे गायन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थाध्यक्ष डॉ. सुभाष वाघमारे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलनाची जबाबदारी रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुजा पळसुळेदेसाई यांनी केले. तर आभार सहकार्यवाह प्रमोद उंटवाले यांनी मानले.