डोंबिवली (शंकर जाधव)
रिक्षातून प्रवास करताना सोन्याच्या दागिन्याने भरलेली बॅग रिक्षातच विसरलेल्या प्रवाशाला डोंबिवली रामनगर पोलिसांच्या अथक मेहनतीने परत मिळाले. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल शहरात कौतुक होत आहे. सीसीटीव्हीत कैद झालेल्या रिक्षाचा शोध घेत रिक्षा चालकाकडून पाच लाखाचे दागिने आणि रोकड हस्तगत करण्यात आली.
डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनबाहेरील रिक्षात बसून प्रकाश कुमार व त्यांची आई घरी जाण्याकरीता बसले. त्यांच्याकडील बँगेत दागिने आणि रोकड होती. रिक्षातुन उतरल्यावर घरी गेल्यावर काही वेळानंतर त्यांच्या लक्षात आले की आपली बॅग रिक्षात विसरलो. प्रकाशकुमार यांनी घडलेला प्रकार डोंबिवली रामनगर पोलिसांना सांगितला रामनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सचिन सांडभोर आणि पोलिस कर्मचारी शिवाजी राठोड आणि विशाल वाघ यांनी सीसीटीव्हीच्या साहाय्याने ती रिक्षा शोधली. पोलिसांना ती बॅग रिक्षाचालकाच्या घरी सापडली. पोलिसांनी प्रकाश कुमार यांना पाच लाख 4 हजार रुपये किंमतीचे दागिने आणि रोकड परत केली आहे.