घर (Home) म्हंटलं की प्रत्येकाच्या डोळ्यासमोर येते ती शांततेची आणि समाधानी जागा. आजकाल प्रत्येकच जण नोकरी अथवा व्यवसायानिमित्त सतत प्रवास करत असतो. कामाचे ठिकाण (Work Place) वैगरे जरी आवडीचे असले तरी तिथे हवी तशी शांतता मिळत नाही. म्हणूनच बऱ्याचदा आपल्याला घड्याळाचे काटे स्वतःच फिरवून संध्याकाळ करू वाटते. जेणेकरून गृहशांतीचा अनुभव घेता येईल.

खरंतर घरात राहणारी माणसं ३ ४ प्रकारची असतात. म्हणजे सुरवातीपासून बघायल गेल तर आजकालच्या नवीन जोडप्यांमध्ये बहुदा दोघेही कामावर जातात. प्रवासात तासंतास वेळ घालवणे त्यांना परवडण्यासारखे नसते. कामाचा तणाव त्यात प्रवासाचा वेगळा ताण सगळ्यांनाच झेपतो अस नाही. त्यामुळे शक्यतो बसस्थानक किंवा रेल्वेस्टेशनच्या आसपास घर बघावं. जर स्वतःचे वाहन नसेल तर रिक्षास्टॅंड बद्दलसुद्धा माहिती काढावी. नसल्यास किती दिवसात सुरु होऊ शकतो याची चौकशी करावी. ही गोष्ट तितकीशी गंभीर वाटत नसली तरी आहे. काही दिवसांपूर्वी माझ्या मैत्रिणीने नवीन घर घेतलं. घर अगदी उत्तम होतं. सगळ्या सोयीसुविधांनीयुक्त. तिला एक लहान बहीण आहे जिची काही दिवसांपूर्वी १०वी ची परीक्षा सुरु होती. घरातून वेळेआधी निघूनसुद्धा केवळ रिक्षा मिळाली नसल्यामुळे तिला महत्वाच्या पेपरला पोहोचायलाच उशीर झाला आणि याचा परिणाम तिच्या मार्कांवर दिसून आला. लहान मुले असल्यास अगदी दवाखाना, शाळा या सगळ्या गोष्टी शक्यतो जवळपासच बघितल्या तर मुलांचा अर्धाअधिक वेळ वाचतो. याचं उदाहरण म्हणजे, माझा भाचा जो आता ५वी मध्ये आहे. शाळा घरापासून लांब असल्यामुळे त्याचा रोजचा १ ते दीड तास आजकाल ट्रॅफिकमुळे त्याही पेक्षा जास्त अवधी हा शाळेच्या बस मध्ये जातो. यामुळे त्याला नीट खेळायला, अभ्यासाला वेळ मिळत नसल्याने त्याचा स्वभाव अत्यंत चिडचिडा झाला आहे.


या उलट जे लोक आता रिटायरमेंटच्या मार्गावर आहेत त्यांचा वेळ तर संपता संपत नाही. त्यामुळे घराजवळ बाग, मंदिर, वाचनालय ह्यापैकी काही असेल तर त्यांचा वेळ अगदी उत्तम जाऊ शकतो. त्यामुळे आपण यातील कोणत्या प्रकारात बसतो याचा विचार करूनच घराची निवड करा.

हे झालं जागा आणि परिसराबद्दल, घर घेताना आणखी काही गोष्टी महत्वाच्या असतात त्यातील एक म्हणजे तुमचे बजेट. तुम्हाला परवडणाऱ्या दरातील घरच शक्यतो तुम्ही पसंत करा अन्यथा एखादे घर आवडल्यास ते बजेट बाहेर असेल तर माणूस हौसेला मोल नाही या म्हणीला सत्यात उतरवून कर्जबाजारीदेखील होतो. घरातील सर्व व्यक्तींचे मत विचारात घेऊन मगच वाटचाल करा. आजूबाजूला राहणाऱ्या लोकांकडून त्या परिसराबद्दल किंवा जागेबद्दल खात्री करून घेऊन मगच घर घेण्याचा निर्णय निश्चित करा. ते तुमच्या आधीपासून तेथे राहत असल्यामुळे त्यांना त्या जागेचा जास्त चांगला अनुभव असतो जो तुम्हाला फायदेशीरच ठरेल.
गायत्री आष्टेकर