डोंबिवली (शंकर जाधव): श्री गणेश मंदिराच्या वतीने गुढीपाडवा निमित्त डोंबिवली शहरातून सुरु करण्यात आलेल्या नववर्ष स्वागत यात्रेच्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त यावर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे आणि आमदार प्रमोद ( राजू ) पाटील आदी उपस्थित राहणार आहेत. यावर्षीच्या स्वागत यात्रेच्या कार्यक्रमाची माहिती मंदिराच्या सभागृहात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली.
श्री गणेश मंदिर संस्थेच्या अध्यक्षा अलका मुलातिक, सेक्रेटरी प्रवीण दुधे,उपाध्यक्ष सुहास आंबेकर,ज्येष्ठ विश्वस्त राहुल दामले, श्रीपाद कुलकर्णी,संयोजक समिती प्रमुख दत्ताराम मोंडे,सहकार्यवाहक डॉ.उत्कर्ष भिंगारे, विश्वस्त गौरी खुंटे, सहसंयोजक मिहीर देसाई, महिला विभाग प्रमुख दिपाली काळे, माजी विश्वस्त निलेश सावंत, शिरीष आपटे आदी उपस्थित होते.यावेळी दुधे यांनी माहिती देताना म्हणाले, श्री गणेश मंदिर संस्थांचे ९९ वर्ष असून ८ मे २०२३ रोजी शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहे.यंदाच्या तर नववर्षस्वागत यात्रेला रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त वसुधैव कुटुंबकम
ही संकल्पना आहे. स्वागतयात्रेत ६५ ते ७० चित्ररथ सहभागी होणार आहेत.
१५ मार्च रोजी रौप्यमहोत्सवी स्वागत यात्रा उद्घाटन सोहळा व महाआरती प.पु.स्वामी गोविंददेव गिरी महाराज उपस्थित राहणार आहेत. शनिवार १८ मार्च रोजी जलसारक्षरता अभियान प्रदर्शन व चित्रफितीद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. १९ तारखेला आप्पा दातार चौकात सांकृतिक पथ ( सेक्फी पाॅईट), सायंकाळी ७ वाजता श्री.ग.दि.माडगूळकर विरचित गीत रामायण
मध्ये गायक श्रीधर फडके उपस्थित राहणार आहेत. २१ तारखेला संभाजी महाराज बलिदान दिनी सायंकाळी साडे पाच वाजता कान्होजी जेधे ( भागशाळा ) मैदान येथे योगा-शारीरिक प्रात्यक्षिके, मानवी मनोरे, ढोल-लेझीम –झांज वादन तसेच फटक्याची आतिषबाजी करण्यात येणार आहे.याप्रसंगी प्रमुख पाहुणे पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ उपस्थित राहणार आहेत. शहरातील प्रतिथयश नृत्यसंस्थांचे कलाकार आपली कला सादर करतील.