एजबॅस्टन येथे शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या इंग्लंड (England) विरुध्दच्या पाचव्या कसोटी सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) खेळणार नसल्याचे आता निश्चित झाले आहे. गेल्यावर्षी स्थगित झालेल्या मालिकेत भारताकडे २-१ ची आघाडी आहे. त्यामुळे पुनर्नियोजित केलेला हा सामना जिंकून मालिका जिंकण्यास टीम इंडिया (Team India) उत्सुक आहे.
इंग्लंडला घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत पराभूत करण्याची टीम इंडियाला ही नामी संधी आहे. या सामन्यात नवनियुक्त कर्णधार जसप्रीत बुमराहच्या कर्णधारपदाचीही ‘कसोटी’ लागणार आहे. गेल्या वर्षी इंग्लंड दौऱ्यावर तत्कालीन कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळण्यासाठी आला होता. या मालिकेतील चार सामने खेळले गेले होते, परंतु पाचव्या कसोटी सामन्यापूर्वी कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. आता ही कसोटी उद्या म्हणजेच शुक्रवारपासून खेळवली जाणार आहे.