डोंबिवली (शंकर जाधव) डोंबिवलीतील अष्टविनायक महिला गोविंदा पथक यंदा दहीहंडी उत्सवात सहभागी होणार नाही. या महिला गोविंदा पथकाला २५ वर्ष पूर्ण झाली असून यंदा हे पथकाचा दहीहंडी फोडतानाचा थर डोंबिवलीकरांना पहावयास मिळणार नाही. या पथकात सुमारे २५० महिला असून कोरोना काळात दहीहंडी फोडण्यासाठी थर लावण्याचा सराव नसल्याने यावर्षी हे पथक दहीहंडी फोडणार नाही.
डोंबिवली पश्चिमेकडील उमेशनगर येथील माजी नगरसेवक प्रकाश भोईर आणि माजी नगरसेविका सरोज भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली अष्टविनायक महिला गोविंदा पथक आणि पुरुष गोविदा पथक आहे. २०२० ला करोनाचे संकट असल्याने सर्व उत्सवावर सरकारने निर्बध लागू केले होते. या कारणामुळे महिला गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्यासाठी थराचा सराव करता आला नाही. तर यातील काही मुलींंचे लग्न झाले. त्यामुळे पथकातील महिलांची संख्या कमी झाली आहे. महिला गोविंदा पथकाला संजय धुरी हे प्रशिक्षण देत होते. तर माजी नगरसेविका भोईर ह्या मार्गदर्शन करत होत्या.
करोनाच्या दोन वर्षात सर्व उत्सव रद्द झाले होते. करोनाचे संकट दूर झाल्याने यावर्षी सर्व उत्सव साजरा होत महिलांसाठी विशेष दहीहंडी लावली जाते. यावर्षी डोंबिवलीतील अष्टविनायक महिला गोविंदा पथक नसल्याने कल्याण येथील एकमेव महिला गोविंदा पथक डोंबिवलीत येतील.