डोंबिवली (शंकर जाधव) डोंबिवली शहरात या हंगामात राखी विक्रीची सुमारे दोन कोटींची उलाढाल होत असे. मात्र आता यावर्षी पावसामुळे व्यवसाय डबघाईला आल्याने विक्रेते संकटात आले आहेत.
बाजारपेठेत रक्षाबंधन सणानिमित्त विविध प्रकारच्या रंगीबेरंगी आणि लक्षवेधी राख्या विक्रेत्यांची दुकाने थाटली आहेत. आकर्षक राख्या आणि विद्युत रोषणाई यामुळे राखी दुकानात झगमगाट दिसून येत आहे. मात्र धुवादार पावसामुळे व्यावसायिकांची तारांबळ उडत आहे. पावसामुळे राख्या खरेदीसाठी महिलांची गर्दी कमी आहे. पावसामुळे राखी विक्री व्यवसायावर परिणाम झाला असून व्यवसायात ५० टक्के मंदी आली असल्याचे विक्रेते सांगत आहेत.
शहरात स्टेशन जवळील पूर्व पश्चिम भागात सुमारे १५० राखी विक्रेते आपला व्यवसाय करतात. पूर्वेला उर्सेकर वाडी, फडके रोड, रामनगर, पाटकर रोड, भाजी मार्केट तर पश्चिमेला दीनदयाळ रोड, गुप्ते रोड, महात्मा फुले रोड, सम्राट चौक, गोपीचौक आदी ठिकाणी राखी विक्री व्यवसायिकांची दुकाने थाटली आहेत. हा हंगामी व्यवसाय असून रक्षाबंधन सणाच्या पूर्वी साधारण पंधरा दिवस व्यवसाय सुरू होतो.
राखी विक्रेते विविध प्रकारच्या राख्या मुंबई तसेच गुजरात येथून होलसेल मार्केट मधून विक्रीसाठी आणतात अशी माहिती डोंबिवलीतील राखी विक्रेते पावन भोजविया आणि मुकेश कोठारी यांनी दिली. यावर्षी स्पायडरमॅन, कार्टून, छोटा भीम, मोटू पतलू, मोत्याची राखी, ओम राखी, रेशीम राखी अशा विविध प्रकारच्या चंदेरी, रुपेरी राख्या विक्रीसाठी आहेत.
या राखी व्यवसायाबद्दल सांगताना कोठारी म्हणाले, या व्यवसायाकडे आम्ही हंगामी व्यवसाय म्हणून बघत असलो तरी यामुळे आमची चांगल्याप्रकारे आर्थिक बाजू भक्कम होते. डोंबिवली शहरात मोठ्या प्रमाणात उद्योग चालतो पण यावर्षी पाऊस असल्याने चिंता वाटते. व्यवसाय चांगला होईल म्हणून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी केला असून तो पडून राहिला तर मोठे नुकसान होईल. नेहमी आम्ही फुलांचा आणि हार व्यवसाय करतो मात्र तो मोठ्या प्रमाणात नसतो. राखी व्यवसायामुळे आमची वर्षाची बचत होते ती आता पावसामुळे शक्य होणार नाही.
दिवसाला साधारण पाच-सहा हजाराची विक्री होते. परंतु यावर्षी पाऊस असल्यामुळे धंद्यावर परिणाम झाला आहे. महिलावर्ग पावसामुळे येत नसल्याने खरेदी कमी आहे. दरवर्षी खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी असते पण अद्याप अशी गर्दी बाजारांमध्ये होत नाही.
यावर्षी चंदन राखी आणि नजर लागू नये म्हणून “इवलाईज” राखी विशेष लक्षवेधी आहे. चंदन राखी किंमत 80 रुपये तर इवलाईज राखी 200 रुपये किंमतीची आहे. परंतु सर्वसाधारण 10 रुपये पडून 60 रुपयांपर्यंत राखी खरेदी केली जाते. मोती ब्रास राखी अहमदाबाद मधून विक्रीसाठी आणण्यात येते. तिची किंमत साधारण 80 रुपये आहे असे कोठारी यांनी सांगितले.