डोंबिवली ( शंकर जाधव ) २०१५ पासून घरगुती वापराचा गॅस घराघरात पोहोचवण्याचे काम प्रगतीपथावर झाले असल्याने डोंबिवली पूर्व भागातील बहुसंख्य भागात घरगुती गॅस पाईप लाईन द्वारे सुरू झाला आहे. मात्र डोंबिवली पश्चिम विभागात अद्याप सिलेंडर माध्यमातूनच गॅस मिळतो. पश्चिम नागरिकांनाही पाईपलाईनद्वारे गॅस मिळावा यासाठी खासदार डॉ श्रीकांत शिंदे प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नामुळे आता डोंबिवली पश्चिम विभागातही पाईपने घरगुती गॅस मिळणार आहे.

डोंबिवली पश्चिम भागात पाईपलाईनने गॅस पोहोचण्यात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते. डोंबिवली पश्चिमेची भौगोलिक परिस्थिती पाहता एका बाजूने खाडी व दुसऱ्या बाजूने संपूर्ण रेल्वे लाईन ने वेढलेला असा डोंबिवली पश्चिम विभाग आहे. खाडी किंवा रेल्वे रूळ यांना पार करूनच गॅस पाईपलाईनने घराघरात पुरवठा करणे शक्य होणार होते. यात प्रामुख्याने जागेची उपलब्धता, रेल्वेची परवानगी व सक्षम साधनसामुग्री अशा अडचणी होत्या. ही अडचण आता सोडविण्यात आली असून महानगर गॅस कंपनीला गणेशमंदीर समोरील गार्डनमधील कॅन्टीन समोरील जागा देण्यात आली आहे. त्या ठिकाणी पंधरा फूट खोल खड्डा खोदण्यात येणार आहे. नंतर डोंबिवली पूर्व ते पश्चिम असा ड्रिलने ५२ मीटर बोगद्यातून एक घरगुती आणि दुसरा सीएनजी पेट्रोल पंप साठी ४ इंचाची व एक ८ इंचाची अशी पाईपलाईन जोडण्यात येणार आहे. रेल्वे लाईन खालून गॅस लाईन टाकण्यासाठी जर्मनीहून ड्रिलीन्ग मशीनही मागवण्यात आले आहे. या कामासाठी रेल्वेची परवानगी मिळाली आहे.
या कामाची सुरुवात गार्डनमधे झाली असून कामाची पाहणी करण्यासाठी खासदार कार्यालय प्रमुख प्रफुल्ल देशमुख, शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांनी सोमवारी सकाळी पहाणी केली. येत्या काही दिवसातच रेल्वेलाईन खालून ड्रिलीन्ग चे खुद्द काम खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते सुरू करण्यात येणार आहे असेही राजेश कदम यांनी सांगितले.