डोंबिवली (शंकर जाधव) पावसाळ्यात वीज पुरवठा खंडित होणं डोंबिवलीकरांना नवीन नाही. मात्र नऊ तास बत्ती बुल झाल्याने संतापलेल्या महिलांनी रात्री 11 वाजता थेट डोंबिवली पश्चिमेकडील आनंदनगर येथील विजवितरण कंपनीवर मोर्चा काढला. रात्री उशिरा 11 वाजेपर्यत वीज पुरवठा पूर्ववत न झाल्याने रात्री काढलेल्या मोर्चाकरांना आश्वासन देण्यात आले. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा सात तास वीज पुरवठा खंडित झाला होता.
सोमवारी सायंकाळी 5 वाजता डोंबिवली पश्चिम राहुल नगर येथे केबल फॉल्ट मुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे परिसरातील 6 इमारती व 3 चाळीतील रहिवासी वैतागले होते. आनंद नगर येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयात नागरिकांचे फोन आल्यावर दुरुस्तीचे काम सुरू झाले. मात्र चार- पाच तास उलटूनही वीज पुरवठा पूर्ववत झाला नव्हता. कर्मचारी दुरुस्तीचे काम करत असताना दुरुस्ती होत नसल्याने अखेर वैतागलेल्या परिसरातील संतापलेल्या महिलांनी आनंदनगर येथील वीज वितरण कंपनीवर रात्री मोर्चा काढला.आमचे प्रयत्न सुरु असून लवकरच वीज पुरवठा पूर्ववत होईल असे आश्वासन देण्यात आले. अखेर रात्री उशिरा 1 वाजता दुरुस्तीचे काम झाल्यावर वीज पुरवठा पूर्ववत झाला. मात्र दुसऱ्या दिवशी मंगळवारी पुन्हा दुरुस्तीच्या कामासाठी सकाळी 9 वाजता वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. सायंकाळी 5 वाजेपर्यत बत्ती बुल होती.