31 C
Mumbai
Friday, May 5, 2023
HomeKalyan-Dombivliमनपा पार्कींग बांधकाम ठेकेदाराकडून ३४ लाखांची वीजचोरी

मनपा पार्कींग बांधकाम ठेकेदाराकडून ३४ लाखांची वीजचोरी

डोंबिवली (शंकर जाधव)

कल्याण पश्चिमेत मनपाच्या पार्कींगचे बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने तब्बल ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांची वीजचोरी केल्याचे महावितरणच्या पथकाने नुकतेच उघडकीस आणले. याप्रकरणी एनसीसीसीएल-किंजल-केटीआयएल कन्सॉर्टियम कंपनी व पर्यवेक्षक फौज सिंग यांच्याविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात वीजचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण पश्चिमेतील कोर्ट परिसरासमोर कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या पार्कींगचे बांधकाम सदर कंपनीकडून सुरू आहे. शिवाजी चौक शाखेचे सहायक अभियंता मोहम्मद शेख, दक्षता व अंमलबजावणी विभागाचे रामचंद्र मासाळे यांच्या पथकाने १९ डिसेंबरला या बांधकामाच्या वीजपुरवठ्याची तपासणी केली. या तपासणीत बांधकामाच्या कामासाठी फिडर पीलरमधून थेट वीजवापर सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

अधिक तपासणीत सदर कंपनीने जानेवारी २०२२ ते डिसेंबर २०२२ या कालावधीत विनामीटर ८४ हजार ३७२ युनिट वीज चोरून वापरल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार ३४ लाख १६ हजार ९६० रुपयांचे चोरीच्या विजेचे देयक भरण्याची नोटीस कंपनीला बजावण्यात आली. परंतू विहीत मुदतीत या रकमेचा भरणा न झाल्याने सहायक अभियंता मोहम्मद शेख यांनी फिर्यादी दिली. त्यानुसार महात्मा फुले चौक पोलिसांनी सदर कंपनी व पर्यवेक्षक सिंग यांच्याविरुद्ध वीज कायदा २००३ च्या कलम १३५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरिक्षक सागर चव्हाण या गुन्ह्याचा तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

Translate »