दिवसेंदिवस रेल्वे मार्गाने (Railway) प्रवास करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. रेल्वे स्थानकांवर होणारी गर्दी, घाईगडबडीत नियमांचे उल्लंघन करून रुळावरून माणसे एका प्लॅटफॉर्म (Platform) वरून दुसऱ्या प्लॅटफॉर्म वर जातात यामुळे बऱ्याचदा अपघात होतात. या सर्वांचा विचार करून प्रशासनाने नव्या पादचारी पुलांचे बांधकाम करण्याचे निश्चित केले आहे. जेणेकरून प्रवाशांची गैरसोय होणार नाही.
रेल्वे प्रशासनाने या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिक, गरोदर महिलांना प्रवास करताना अडचण येऊ नये यासाठी नवीन सरकते जिने (Escalator) तसेच उद्वाहक यंत्र (Lift) बांधण्याचे ठरवले आहे. यासोबतच काही स्थानकांवर सरकते जिने कमी असल्याने त्यांची संख्या वाढवण्यात येणार आहे. या सुविधांचा लाभ घेऊन लोकांना धक्काबुक्की न करता स्थानकांवर पोहोचणे किंवा बाहेर पडणे शक्य होईल.
रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मार्च २०२३ पर्यंत ८३ सरकते जिन्यांचे बांधकाम करण्यात येईल. या सरकत्या जिन्यांची किंमत एक कोटी रुपये इतकी असून रेल्वे मंत्रालयाने मध्य रेल्वे वरील स्थानकांवर १०१ सरकते जिने बांधण्यासाठी मंजुरी दिली आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आला असून मागील वर्षापासून आतापर्यंत ३३ नवे सरकते जिने मध्य रेल्वे प्रशासनाने सांगितले आहे. सरकते जिने व उद्वाहक यंत्र हे केवळ मध्य रेल्वे स्थानकांसाठी नसून पश्चिम रेल्वे स्थानकांवर देखील करण्यात येणार आहेत.