डोंबिवली ( शंकर जाधव ) भूमीपुत्रांना न्याय मिळावा म्हणून काटई नाक्याजवळील मोकळ्या जागेवर गेल्या तीन दिवसांपासून बेमुदत आंदोलन सुरू आहे. मात्र एकही राजकीय पुढाऱ्याने आंदोलनकर्त्यांची भेट घेतली नसल्याने नाराज होऊन बैठक घेतली. यापुढे पुढाऱ्यांना काळे झेंडे दाखवू असा निर्णय बैठकीत घेण्यात आला आहे.
याबाबत बाधित शेतकरी गणेश म्हात्रे म्हणाले, कल्याण -शिळफाटा रस्ता बाधितांना मोबदला देण्यात विलंब लावल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मौजे काटई येथे सर्व पक्षिय युवा मोर्चा व कल्याण-शिळफाटा बाधित शेतकरी यांचे मार्फत बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे. आज आंदोलनाच्या तिसऱ्या दिवसापर्यंत शासन प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे बाधित शेतकऱ्यांनी आंदोलन ठीकाणी तातडीने बैठक घेतली. या बैठकीत सर्व बाधित शेतकऱ्यांनी आपापली मांडली. आंदोलन ठीकाण हे कल्याण-शिळ रस्त्यालगत असल्यामुळे या ठीकाणाहून सर्वच राजकीय नेते पुढारी या ये जा करत असतात. एखादा जबाबदार राजकीय नेता,पुढारी आंदोलन ठीकाणी आंदोलनकर्त्यांची भेट न घेता परस्पर निघून जात असेल तर हा बाधित शेतकऱ्याचा अपमान समजून येताना त्या नेत्या पुढाऱ्याचा काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचे आजच्या बैठकीत सर्वानुमते ठरविण्यात आल्याचे म्हात्रे यांनी सांगितले.यावेळी गजानन पाटील यांसह अनेक बाधित शेतकरी उपस्थित होते.