श्री गणेश मंदिर संस्थानचा विशेष उपक्रम
डोंबिवली ( शंकर जाधव ) – यंदा जगभरात आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरा केले जात आहे. त्याच अनुषंगाने यंदा श्री गणेश संस्थानच्या वतीने रौप्य महोत्सवी शोभायात्रेच्या निमित्ताने भरडधान्यावर आधारित पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याला डोंबिवलीतील महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला.
ज्वारी, बाजरी, गहू, वरई, नाचणी, राळं (फाॅक्सटेल), भगर, कोडो, कांकणी अशा विविध भरडधान्यांपासून महिलांनी विविध पौष्टिक पदार्थ बनवून आणले होते. प्रत्येकांनी त्या-त्या पदार्थांची अतिशय आकर्षक पद्धतीने मांडणी केली होती. सध्याच्या धावपळीच्या युगात आपण फास्टफूड खाऊन विविध आजारांना आमंत्रण देत असतो. त्यामुळे फास्टफूडला फाटा देऊन आपलंच जुने ते सोने ही पारंपारिक पाककृती स्वीकारली तर उलट त्याचा आपल्या आरोग्याला अधिकच फायदा होईल, याच उद्देशाने ही पाककला स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेत एकूण ४४ महिलांनी भाग घेतला. तर परीक्षक म्हणून ज्योती दाते, विदुला आमडेकर, मिहीर देसाई यांनी काम पाहिले.
आदिवासी महिलांचाही सहभाग
शहापूर भागातील खोस्तेपाडा या आदिवासी गावातील महिलांनी त्यांच्याच शेतात सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भरडधान्यांचे अत्यंत चविष्ट पदार्थ बनवले होते. त्यात थालिपीठ, नाचणी आणि मोहफुलापासून बनवलेले लाडू, आंबील, भूजा असे पदार्थ त्यांनी पाककला स्पर्धेत सादर केले होते.
पाककला स्पर्धेतील पदार्थ
पौष्टिक बटवा, राळ्याची खीर, पौष्टिक पाटवड्या, बाजरीची खीर, पौष्टिक काला, भरडधान्याचा जात्याचा केक, प्रवासी मिलेट स्टीक, हुरडा-कांगणी भेळ, मिलेट शीख कबाब, नाचणीचे उकडीचे मोदक, मिलेट ब्राऊनी
पाककला स्पर्धेतील विजेते
प्रथम – आरती शिंदे (मिलेट्सचा केक)
द्वितीय – बबिता अत्रे (मिलेट शीग कबाब)
तृतीय – तेजल सावंत (वरईचे शिवराळे आणि रस)
उत्तेजनार्थ – १. संहिता कांड (प्रवासी मिलेट स्टीक
२. माधवी चांदोरकर (स्टफ तृणधान्य कटलेट)