उत्तम आरोग्य हाच खरा दागिना असे आपल्याला घरचे नेहमी सांगत असतात, पण आताची टेक्नोसॅव्ही जनरेशन याकडे आपआपल्या पद्धतीने पाहते. प्रत्येकालाच आरोग्याची देवी देणगी मिळाली आहे, मात्र ते कसे सुदृढ आणि उत्तम ठेवायचे हे प्रत्येकाच्या हातात असते. नियमित व्यायाम, उत्तम आहार, शुद्ध हवा या सर्व गोष्टींमुळे शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहते, पण या गोष्टींना जोड म्हणून नियमित चालणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
दैनंदिन जीवनात आपण कितीही व्यस्त असलो तरी आपल्या निरोगी शरीराकरिता काही वेळ हा चालण्याकरिता राखून ठेवला पाहिजे. दररोज रात्री किंवा दुपारी जेवण झाल्यावर फेरफटका मारल्यामुळे, नियमित चालण्यामुळे आपल्याला अनेक आजारांना आपल्यापासून दूर ठेवता येते.
१. पचन शक्ती सुधारते – रात्रीच्या जेवणानंतर चालणे तुमच्या शरीराला अधिक गॅस्ट्रिक एंजाइम तयार करण्यास मदत करते, त्यामुळे आपली पचनक्रिया सुधारते त्यामुळे पोट वाढणे, बद्धकोष्ठता कमी होते आणि पोटाशी संबंधित इतर कोणत्याही समस्यांपासून आराम मिळतो.
२. मेटाबोलिजम वाढवते – मेटाबोलिजम वाढवण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे लगेच झोपण्याऐवजी जेवणानंतर फिरायला जाणे. हे तुम्हाला विश्रांती घेताना अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करेल आणि तुमचे शरीर उत्तम स्थितीत ठेवेल.
३. रोगप्रतिकारक शक्ती वाढते – जेवणानंतर चालण्याने तुमची पचनक्रिया सुधारते आणि त्यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकले जातात. यामुळे तुमचे अवयव चांगले काम करतात आणि तुमची प्रतिकारशक्ती सुधारते. मजबूत प्रतिकार शक्तीमुळे कोरोनासारख्या गंभीर संसर्गासह विविध संक्रमणांना दूर ठेवण्यास मदत होते.
४. रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहते – जेवणानंतर ३० मिनिटांनी रक्तातील साखरेची वाढ सुरू होते, जर तुम्ही जेवणानंतर फिरायला गेलात तर काही प्रमाणात ग्लुकोज शरीराद्वारे वापरले जाते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते.
५. सतत भूक लागण्याचे प्रमाण कमी होते – पोटभर जेवूनही अनेकदा पुन्हा भूक लागते, मग जेवणानंतर तुम्ही फिरायला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अन्यथा गरजेपेक्षा जास्त अन्न पोटात जाऊन वजन वाढण्याची समस्या निर्माण होऊ शकते.
६. उत्तम झोप लागते – तुम्हाला शारीरिकदृष्ट्या तंदुरूस्त ठेवण्यासोबतच जेवणानंतर चालणे हे तुमच्या मानसिक आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. जर तुम्हाला रात्री झोपेचा त्रास होत असेल तर रोज रात्री जेवणानंतर फिरायला जा आणि तुम्हाला लवकरच त्याचे परिणाम दिसून येतील.
७. तणाव कमी करण्यासाठी मदत करते – चालण्यामुळे तणाव दूर होण्यास आणि शरीरातील एंडोर्फिन सोडण्यास मदत होते. त्यामुळे तुम्हाला बरे वाटते आणि तुमचा मूड सुधारतो अशाप्रकारे जेवणानंतर चालणे तुम्हाला आनंदी ठेऊ शकते आणि नैराश्यावर मात करू शकते. चालण्याचे प्रमाण नियंत्रित असले पाहिजे. आपल्या शरीराला झेपेल, सहन होईल तितकाच वेळ व तितकेच अंतर चालले पाहिजे. चालण्याची वेळ अचानक वाढवू नये त्याने शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतो, पण खंड न पाडता आणि सहन होईल इतके दररोज चालल्याने आपले शरीर हे आपल्या नियंत्रणात राहते व उत्तम आयुष्य जगण्यास मदत होते.
- गायत्री आष्टेकर