देशातील अनेक राज्यांमध्ये तापमानाने उच्चांक गाठला आहे. भारतीय हवामान विभागाने आंध्र प्रदेशसह आठ राज्यांना उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उष्णतेमुळे अनेक राज्यांमध्ये परीक्षेच्या काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांमध्ये शाळांच्या वेळा पूर्ववत करून विद्यार्थ्यांना उष्णता वाढण्यापूर्वीच घरी पाठवण्यात आले आहे.
पुढील दोन दिवस कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात येत असले तरी आंध्रशिवाय उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडिशा आणि उत्तर प्रदेश या आठ राज्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
सकाळी 8 वाजता जारी करण्यात आलेल्या बुलेटिननुसार उत्तर प्रदेश आणि बंगालच्या किनारी भागात उष्मा वाढण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात बंगालमध्ये गेल्या आठ दिवसांपासून, तर बिहारमध्ये गेल्या पाच दिवसांपासून उष्णता कायम आहे. ईशान्य, उत्तर, पूर्व आणि मध्य प्रदेशातील अनेक भागांमध्ये सरासरीच्या तुलनेत कमाल तापमानात वाढ झाली आहे. पश्चिम हिमालयात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे. बुधवारी काही भागात थंड हवा आणि हलक्या पावसाने नागरिकांना दिलासा दिला.
राज्यांच्या उपाययोजना
पश्चिम बंगाल : मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था आठवडाभर बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना डोकेदुखी आणि इतर शारीरिक त्रास होत असल्याच्या तक्रारी असल्याने हा निर्णय घेतल्याचे त्यांनी नमूद केले.
दिल्ली: दुपारच्या वेळेत मुलांना शाळांमध्ये एकत्र आणण्यासाठी उपक्रम आयोजित करू नयेत असा आदेश दिल्ली सरकारने जारी केला आहे.
बिहार: पाटणा जिल्हा प्रशासनाने शाळांमधील सर्व वर्ग सकाळी 10:45 पर्यंत संपवून बुधवारपासून शाळा सोडण्याचे आदेश जारी केले आहेत.
त्रिपुरा: मुख्यमंत्री माणिक साहा यांनी फेसबुक पोस्टद्वारे राज्यातील सर्व सरकारी शाळा 23 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याची घोषणा केली. त्यांनी खासगी शाळांना असा निर्णय घेण्याचे आवाहन केले.
मेघालय: पश्चिम गारो हिल्स जिल्हा प्रशासनाने बुधवारपासून तीन दिवस सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
ओडिशा: सरकारने राज्यातील सर्व शाळा आणि अंगणवाडी केंद्र चार दिवस बंद ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.