मुंबई गोवा चौपदरी महामार्गाला ‘स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग नाव द्यावे.
महाड, प्रतिनिधी:-. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग (Mumbai Goa Highway) क्रमांक ६६ चे काम अंतिम टप्प्यात असून, या महामार्गाला छ.शिवाजी महाराज यांच्या ‘स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे अशी मागणी भाजपाचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे केली आहे.
समृद्धी महामार्गा प्रमाणे नव्याने होणार्या व कामाच्या अंतिम टप्प्यात असलेल्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ हा कोकणांती समुद्र दुर्ग, छ. शिवाजी महाराज यांच्या गडकोट किल्ले, आणि स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड सह महाराजांच्या समाधीला नमन करीत असुन, या महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला स्वराज्याची महती समजावी यासाठी या महामार्गाला ‘स्वराज्य’ राष्ट्रीय महामार्ग असे नामांतर करावे अशी मागणी भाजपाचे महाड तालुका सरचिटणीस महेश शिंदे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
याच सोबत त्यानी महाड-मढेघाट-वेल्हे-पाबेघाट-खानापूर मार्गे पुणे या मार्गाला पर्यटन महामार्ग म्हणून विकसित करावा अशी मागणी देखील केली आहे. महाड मध्ये २२ जुलै २०२१ रोजी आलेल्या महापुराचे पाणी पाहता नव्याने रुंदीकरण व काॅंक्रीटीकरण होणार्या महाड रायगड मार्गाची उंची वाढणार आहे. मौजे लाडवली पासून मौजे नाते पर्यंत या भागातील पुराच्या पाण्याचा व्यवस्थित निचरा होण्यासाठी या मार्गावरील सिमेंट पाईप (Cement pipe) मोर्यांऐवजी स्लॅप ड्रेन (slap drain) व छोटे पुल बांधण्यात यावेत असे देखील त्यांनी यावेळी सुचवीले. केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी महेश शिंदे यांच्या मागणीची दखल घेतली आणि तुमची मागणी योग्य असुन मी याबाबत योग्य तो पाठपुरावा नक्कीच करेन असे अश्वासन त्यांनी दिले.