डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवलीतील ज्येष्ठ नागरिकाला चक्क गुजराती भाषेतून स्मार्ट कार्ड आल्याने त्यांनी अशा चुकीबद्दल आता कोणाला जाब विचारणार असा प्रश्न उपस्थित केला आहे. हे आधारकार्ड गुजराती भाषेतून बनवून आले असल्याने आता आम्ही काय गुजरातला राहायला जायचे का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. मुंबई गुजरात राज्याला जोडण्याचे प्रयत्न यातून सुरु असल्याचे हे उदाहरण असल्याचा आरोप शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे यांनी यावेळी केला.
डोंबिवली पश्चिमेला खंडेराय इमारतीत बाबूशा दगडू खंडागळे ( 72) राहतात. खंडागळे यांच्याकडे आधारकार्ड होते. खंडागळे यांनी डोंबिवलीतून आधारकार्ड बनवून घेतले होते. मात्र त्यांच्या आधारकार्डमध्ये फक्त जन्म तारखेचा उल्लेख नसून फक्त जन्म वर्षाचा उल्लेख होता. खंडागळे यांनी पुन्हा डोंबिवली पश्चिमेकडील एका आधार कार्ड केंद्रातून आपलं आधार कार्ड अपडेट करण्यासाठी अर्ज केला. खंडागळे यांचे स्मार्ट आधार कार्ड आले. मात्र आपले आधार कार्ड पाहून खंडागळे नाराज झाले. महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेतून नव्हे तर चक्क गुजराती भाषेतून आधारकार्ड आले. खंडागळे यांनी आपल्या मित्राला याची माहिती दिली.
याबाबत शिवसैनिक गोरखनाथ ( बाळा ) म्हात्रे म्हणाले, खंडागळे हे गेल्या ३० वर्षापासून राहतात.`मारो आधार मारो पहचान` असे आधारकार्डमध्ये लिहिले आहे. हा तर महाराष्ट्राचा अपमान आहे. जाणूनबुजून हा प्रकार आहे. यावर आम्ही आंदोलन तर करूच आणि याचा जाहीर निषेधही करतो. अशाप्रकारे महाराष्ट्रातील आधार कार्ड गुजराती भाषेतून आल्याने मुंबई गुजरात राज्याला जोडण्याचा हा प्रयत्न सुरु असल्याचे हे उदाहरण आहे.
ज्येष्ठ नागरिक खंडागळे म्हणाले, मला वाचताच येत नव्हते. मी हे आधार कार्ड दुसऱ्याकडे वाचून घेतले. हे आधारकार्ड गुजराती भाषेतून बनवून आले असल्याने आता आम्ही काय गुजरातला राहायला जायचे का ?