डोंबिवली ( शंकर जाधव )
राष्ट्रीय शिक्षण संस्था डोंबिवली पश्चिम येथील हेडगेवार सभागृहात मॅथ्स् सर्कलचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. विद्याधर शास्त्री यांच्या हस्ते मॅथ्स् सर्कल ह्या अभ्यासकेंद्राचे उद्घाटन करण्यात आले. ह्या कार्यक्रमासाठी विनय नायर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे माजी कार्यवाह संजय कुलकर्णी,डॉ. सरोज कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.
गणित हा बहुतांश विद्यार्थ्यांच्या अंगावर काटा आणणारा विषय. या विषयांत अनुत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असते. गणिताचे ज्ञान व वापर हा नेहमीच व्यक्ती व समाज या दोन्ही पातळीवर जीवनाचा अविभाज्य भाग आहे.म्हणूनच गणित स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना तरबेज करणे, गणित ऑलिंपियाड मध्ये पुढे घेऊन जाणे यासाठी प्रायोगिक तत्त्वावर रोटरी क्लब ऑफ सन सिटी डोंबिवली यांनी बेसिक मॅथ्स् मजबूत करण्यासाठी, बौध्दिक क्षमता, चिंतन, विचार करण्याची क्षमता वाढविण्यासाठी प्रायोजकत्व स्विकारले आहे.प्रत्येक शनिवारी दिड तास हे वर्ग चालविले जाणार आहेत.या कार्यक्रमाला एकूण ६५ पालक व सर्व शाखांचे निवडक विद्यार्थी,सर्व शाळांचे मुख्याध्यापक ही कार्यक्रमासाठी उपस्थित होते.तसेच प्रसाद तांबे सर, शाळेचा माजी विद्यार्थी केदार पेणकर,नेहा बारवकर,मानसी महाजन, नायर उपस्थित होते. कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण सुत्रसंचलन मुख्याध्यापिका वैभवी सावंत यांनी केले.डाॅ.सरोज कुलकर्णी यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

