डोंबिवली ( शंकर जाधव )
डोंबिवली निवासीमध्ये रस्त्यांचे काँक्रीटीकरण काम एमएमआरडीए तर्फे चालू आहे. सद्या निवासीमधील मुख्य रस्ता असलेला डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी मार्गावर रस्त्यांचे काम चालू असताना काही जागृत रहिवाशांनी या रस्त्यांची उंची बरीच वाढल्याने येणाऱ्या पावसाळ्यात येथे असलेल्या रहिवासी इमारती, दुकाने आणि बंगलो मध्ये पावसाळी पाणी साचून राहणार असल्याचे लक्षात आणून दिले आहे. आताच काँक्रीटीकरणचा काही टप्पा बांधण्यात आल्यावर हे प्रकर्षाने जाणवते आहे. याबद्दल काही रहिवाशांनी रस्त्यांचा कामावरील सुपरवायझर, इंजिनिअर यांना ही बाब लक्षात आणून दिली असता त्यांनी यात फारसे मनावर न घेता काम तसेच चालू ठेवले आहे. सदर रस्ता तयार करतांना जास्त खोदला न जाता वरूनच त्यावर थर जमा केल्याने रस्त्यांची उंची ही पूर्वीपेक्षा अंदाजे दीड फुटाने वाढणार असे दिसत आहे.
या मुख्य रस्त्यावरील असलेल्या मारुती, कार्तिकेय, सूर्यमिलन, कोयना, एकदंत हेरिटेज, हर्षवर्धन, उषाकाल, संदेश, शिवछाया, हार्दिक, चैत्रबन इत्यादी रहिवासी सोसायटी सह अनेक दुकाने, बंगलो यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाळी पाणी शिरून नुकसान होणार आहे. सध्या याआधीची रस्त्यांची उंची खाली असतानाही या परिसराला पावसाळी पुराचा फटका नेहमी बसत असतो. आता तर रस्त्यांची उंची वाढल्याने इमारतींच्या तळ मजल्यावरील संडास, बाथरूम या लेव्हलचा वरती रस्ता येणार असल्याने आणि त्यात यापूर्वी बनवलेली नवीन गटारे/नाले ही अर्धवट, चुकीची बांधल्याने त्याचाही फटका मोठ्या प्रमाणात रहिवाशांना बसणार आहे.एमएमआरडीए यांनी हे काम ज्या ठेकेदार कंपनीला दिले आहे त्याची आणि रस्त्यांचा कामाची माहितीचा फलक लावणे बंधनकारक असताना तो फक्त उद्घाटन – भूमिपूजन पुरता एक दिवसाकरिता लावला होता. त्यानंतर तो गायब झाला आहे. सदर रस्ता खोदाई किती फूट करणार, रस्त्यांची उंची किती असणार, कोणते रस्ते बनविणार, किती दिवसात काम पूर्ण होणार इत्यादी माहिती जनतेला मिळणे आवश्यक असताना ती जनतेसमोर का ठेवण्यात येत नाही असे येथील रहिवाशांना प्रश्न पडला आहे. निवासी मधील रहदारीचा महत्त्वाचा सर्व्हिस रोड आणि इतर काही अंतर्गत रस्ते हे बनविणार नसल्याचे माहिती पडत आहे. हेही रस्ते बनविणे आवश्यक आहे. सदर निवासी मधील या रस्त्यांचा समस्या बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी, इच्छुक नगरसेवक यांनी ताबडतोब लक्ष घालून यावर योग्य निर्णय घ्यावा ही विनंती.