
डोंबिवली ( शंकर जाधव) माणकोली ते मोठागाव ठाकुर्ली जोडणाऱ्या खाडी पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे .मे अखेर पर्यंत हे काम पूर्ण होवून तो पूल जूनमध्ये वाहतुकीसाठी खुला केला जाण्याची शक्यता आहे .त्यामुळे ठाणे – डोंबिवली अंतर २० मिनिटात गाठता येईल .मात्र प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळीच आहे .हा सहा पदरी पूल डोंबिवलीत जिथे उतरणार आहे, तो मोठागाव ते डोंबिवली स्टेशन रस्ता अवघा दुपदरी आहे .त्यातच मोठागाव येथे रेल्वे फाटक आहे.तसेच संपूर्ण डोंबिवलीत चार पदरी देखील एकही रस्ता अस्तित्वात नाही .त्यामुळे सहापदरी माणकोली – मोठागाव पूल वाहतुकीसाठी सुरु झाल्यावर डोंबिवली पश्चिमेत नव्याने वाहतूक कोंडीचे संकट निर्माण होणार आहे.येथील डीपी प्लान मधीक सात रस्ते रिंगरुटला जोडले जातील.शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होऊ नये याकरता अंर्तगत तीन रस्ता बनविला जाणार असून याची पाहणी पालिका आयुक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे व शिवसेनेचे माजी नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी केली.
डोंबिवली हे रेल्वे मार्गावरील शहर आहे .या शहरातून एकही राष्ट्रीय वा राज्य महामार्ग जात नसल्याने डोंबिवलीतून ठाणे ,मुंबईला ये – जा करण्यासाठी कल्याण, भिवंडी – नाशिक बायपास मार्गे किंवा कल्याण शिळफाटा ,मुंब्रा मार्गे जावे लागते. या दोन्ही मार्गांमुळे वेळ व इंधन अधिक प्रमाणात खर्च होत आहे. अनेकदा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. हीच होणारी गैरसोय लक्षात घेवून एमएमआरडीएने सुमारे २२३ कोटी २५ लाख रुपये खर्चाचा हा पूल बांधण्याचा निर्णय २०१६ मध्ये घेतला. हा पूल पूर्ण झाल्यावर डोंबिवलीतून ठाणे गाठण्यासाठी अवघ्या २० मिनिटांचा कालावधी लागणार असल्याने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.सध्या या पुलाचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे .मे अखेरीस या पुलाचे काम पूर्ण होवून जून महिन्यात पूल वाहतुकीला खुला केला जाण्याची चिन्हे आहेत .