डोंबिवली ( शंकर जाधव )
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात बनावट कागदपत्रांच्या द्वारे मोठ्या प्रमाणात शासनाची फसवणूक झाली आहे. अनेक ठिकाणी रेराची व ग्राहकांची फसवणूक करण्यात आली आहे. या संदर्भात मनसे आमदार प्रमोद(राजू)पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे उच्चस्थरीय चौकशीची मागणी देखील केली होती. शुक्रवारी अर्थसंकल्पीय अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित झाल्या नंतर मंत्री उदम सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात असलेल्या शाळा,क्रीडांगण आणि आदी आरक्षित जागांवर अनधिकृत बांधकामे करण्यात आली आहेत. अनेक ठिकाणी अधिकृत बांधकामांची बनावट कागदपत्रांच्या आधारे दस्तनोंदणी देखील करण्यात आली आहे. यामध्ये टोकन घोटाळा देखील समोर आला होता. त्यावेळीच मनसे आमदार प्रमोद(राजू) पाटील यांनी ठाणे पोलीस आयुक्तांना लेखी पत्र देऊन उच्चस्थरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. या बाबत चौकशी देखील सुरु आहे. मात्र यामध्ये फक्त काही ठराविक उद्योजकांची चौकशी हि केली जात आहे. मात्र या अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात होत. मात्र या संदर्भात मनसे आमदार राजू पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा करून संबंधित प्रश्नी विधानसभेत भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी देखील आवाज उठवला आहे. यावर मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करून दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे सांगितले . कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात सर्वाधिक अनधिकृत बांधकामे सुरु आहेत. मात्र वारंवार पत्रव्यवहार करून जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आवाज उठवून देखील कारवाई होत नसल्याने शुक्रवारी हा विधानसभेत मुद्दा उपस्थित करण्यात आला . कल्याण डोंबिवली मध्ये ६५ विकासकांनी ऱेराची फसवणूक केली आहे. यामध्ये फक्त वास्तुविशारद आणि जमीन मालकांना दोषी धरण्यात आले आहेत. मात्र या बांधकामांना पाठीशी घालणाऱ्या प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांवर महापालिकेने कोणत्याही प्रकारची कारवाई केलेली नाही. त्यामुळे हा प्रश्न आमदार राजू पाटील आणि गणपत गायकवाड यांनी विधानसभेत मांडल्यानंतर अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करणार असल्याचे मंत्र्यांनी जाहीर केले आहे.
कल्याण शीळ रस्त्यावरील पलावा चौकात एमएमआरडीएच्या उड्डाणपुलाचे काम गेल्या कित्तेक वर्षांपासून सुरु आहे. आणि हे बांधकाम एमआयडीसीच्या मुख्य जलवाहिनीवर करण्यात आले आहे. यामध्ये अनधिकृत हॉटेल्स आणि वाईन शॉप सुरु आहेत. या बाबत न्यायालयाने देखील आदेश दिले आहेत. या संदर्भात वारंवार सांगून देखील अधिकाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने या प्रकरणी देखील अधिकाऱ्यांवर चौकशी करून कारवाई होणार आहे. या बांधकामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून उड्डाणपुलाचे काम देखील रखडले आहे. त्यामुळे आता केडीएमसी अधिकारी यामध्ये कधी लक्ष देणार आणि हे बांधकाम पडणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.