डोंबिवली ( शंकर जाधव )
उल्हासनगर शहरातील अनधिकृत इमारतींवर नव्व्दच्या दशकात कारवाई करण्यात आली होती. यामध्ये इमारतींचे स्लॅब तोडण्यात आले होते. मात्र पिलर तोडले नसल्याने त्या इमारतींमध्ये दुरुस्ती करून नागरिकांनी वास्तव्यास सुरुवात केली होती. मात्र आता या इमारतीचे स्लॅब कोसळू लागले आहेत. अशीच परिस्थिती काही काळखंडात कल्याण डोंबिवली परिसराची होणार आहे. महापालिकेकडून दररोज अनधिकृत बांधकामांची यादी प्रसिद्ध होते. कारवाई देखील करण्यात येते. मात्र कारवाईत इमारतीचे मधील स्लॅब तोडले जात असून पिलर तोडले जात नाहीत. त्यामुळे या इमारतींचे स्लॅब दुरुस्त करून इमारती पुन्हा उभारल्या जात आहेत. त्यामुळे या सर्व अनधिकृत बांधकामांना प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करणार का ? असा प्रश्न मनसे आमदार राजू पाटील, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उपस्थित केला होता. आता मंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करणार असल्याचे सांगितले आहे. या संदर्भात पुन्हा एकदा ठाणे जिल्हाअधिकाऱ्यांकडे या प्रकरणी पाठपुरावा करून दोषी अधिकाऱ्यांवर देखील कारवाईसाठी पाठपुरावा करणार असल्याचे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले आहे.