डोंबिवली ( शंकर जाधव )
महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कल्याण आणि रत्नागिरी परिमंडलाचा ११६ खेळाडूंचा संयुक्त संघ जळगावला रवाना झाला. २ ते ५ फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या स्पर्धेतील अभियंता, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संघाला मुख्य अभियंता धनंजय औंढेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
वीज वितरण सारख्या धकाधकीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अभियंते, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी महावितरणच्या वतीने दरवर्षी क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. गेली दोन वर्षे कोविड विषाणूच्या प्रादुर्भावामुळे या स्पर्धा होऊ शकल्या नाहीत. दोन वर्षांच्या खंडानंतर आयोजित स्पर्धेसाठी ८८ पुरुष आणि २८ महिलांचा समावेश असलेला कल्याण आणि रत्नागिरी परिमंडलाचा संयुक्त संघ उत्साहाच्या वातावरणात निवडण्यात आला. या स्पर्धेत खो-खो, ॲथलेटिक्स, क्रिकेट, बॅडमिंटन, टेबल टेनिस, टेनिक्वाईट, कॅरम, कबड्डी, व्हॉलीबॉल, कुस्ती, बुद्धिबळ आणि ब्रिज या खेळांचा समावेश आहे. वैयक्तिक, सांघिक आणि सर्वसाधारण या तिन्ही प्रकारात पारितोषिके जिंकण्यासाठी मुख्य अभियंता औंढेकर, अधीक्षक अभियंते दीपक पाटील, दिलीप भोळे, सहायक महाव्यवस्थापक धैर्यशिल गायकवाड, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी रामगोपाल अहिर यांनी सहभागी खेळाडूंना शुभेच्छा देवून जळगावला रवाना केले.