डोंबिवली (शंकर जाधव) २८ ऑगस्ट २०२२ रोजी संपन्न झालेल्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कॉम्रेड्स मॅरेथॉन ही स्पर्धा कल्याण रनर्सचे धावपटू दिलीप घाडगे, डॉ. मिलिंद ढाले व बिंदेश सिंग यांनी यशस्वीपणे पूर्ण करून कल्याण डोंबिवली शहराचा नावलौकिक जागतिक पातळीवर पोहोचविल्याबद्दल महापालिका आयक्त डॉ. भाऊसाहेब दांगडे यांनी महानगरालिकेच्या वतीने या तीन धावपटूंचा प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला.
कॉम्रेडस ही दक्षिण आफ्रिकेत आयोजित होणारी जगातील सर्वात मोठी लांब पल्ल्याची मॅरेथॉन (९० किमी) आहे. या वर्षी संपूर्ण जगातील १०० हून अधिक देशातून एकूण १५००० पात्र धावपटू यात सहभागी झाले होते. ही विश्वविख्यात कॉम्रेड मॅरेथॉन स्पर्धा दिलीप घाडगे यांनी ११ तास ३० मिनिटे, डॉ. मिलिंद ढाले यांनी ११ तास ४६ मिनिटे व श्री बिंदेश सिंग यांनी ११ तास ३६ मिनिटे वेळेत पूर्ण केली व आजवर पाहिलेले स्वप्न पूर्ण केले. डॉ. मिलिंद ढाले, दिलीप घाडगे आणि बिदेश सिंग यांनी ही नामांकित कॉम्रेड्स मॅरेथॉन पहिल्याच प्रयत्नात यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
कल्याण शहरातील या तिन्ही धावपटूंनी जगप्रसिद्ध कॉम्रेड्स मॅरेथॉन रन पूर्ण करून कल्याण डोंबिवली शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आणि कल्याण डोंबिवली शहरांचे नाव जगाच्या पटलावर आणल्याबद्दल महापालिकेच्या वतीने महापालिका आयुक्त दालनात त्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमास शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली), मुख्य लेखा व वित्त अधिकारी सत्यवान उबाळे व कार्यकारी अभियंता प्रशांत भागवत उपस्थित होते.