गोवा, उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपला मिळालेल्या यशानंतर राज्यभरातील भाजप कार्यकर्ते जल्लोष करत आहेत. डोंबिवलीतही भाजप आमदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भाजप कार्यकर्त्यांनी असाच आनंदोत्सव साजरा केला. यावेळी घरडा सर्कल ते गणपती मंदिर अशी रॅली काढण्यात आली. रॅलीत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. राम मंदिराची प्रतिकृती असलेला रथ रॅलीत सहभागी झाला होता. या वेळी आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले की, निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. आता योगीजी पुन्हा मुख्यमंत्री झाल्यामुळे राममंदिराचे काम लवकरच होईल याची खात्री आहे. देशातील तमाम नागरिक नरेंद्र मोदींच्या पाठीशी असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे, अशी स्तुती रवींद्र चव्हाण यांनी केली. चार राज्यात भाजपची सत्ता आली आहे. ते महाराष्ट्राच्या राजकारणातही येईलच. कारण गोव्यात ते सिद्ध झाले आहे.

त्यांनी भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी उमेदवार उभे केले, परंतु त्या उमेदवारांना NOTA पेक्षा कमी मते मिळाली. मतदारांनी त्यांची योग्यता दाखवून दिली आहे. अशी तिखट टीका भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेवर केली आहे. एवढेच नाही तर गोव्यातील विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्याकडे देण्यात आली होती, त्या जागेवर भाजपच्या उमेदवाराच निवडूनदेखील आला आहे. भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती लावली होती, त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले.