माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने अखेर सोमवारी इयत्ता ११ वीच्या प्रवेश प्रक्रियेचा पुढील टप्पा जाहीर केला. पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार आहे. आता अकरावीचे अर्ज भरण्यासाठी बुधवार २७ जुलै पर्यंत वेळ देण्यात येणार आहे.
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा (CBSE) दहावीचा निकाल जाहीर होताच अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेला वेग आला असून शिक्षण विभागाने सोमवारी प्रवेश प्रक्रियेचे तपशीलवार वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार अकरावीची पहिली प्रवेश यादी ३ ऑगस्टला जाहीर होणार आहे. सध्या अकरावीचे प्रवेश अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख २७ जुलैपर्यंत देण्यात आली आहे. पहिल्या फेरीची तात्पुरती सामाईक गुणवत्ता यादी गुरुवारी २८ जुलै जाहीर होणार आहे. त्यावरील हरकती, आक्षेप विचार करून त्यानुसार पहिल्या फेरीची प्रवेश यादी जाहीर केली जाईल. प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जाचा भाग दोन म्हणजेच कॉलेजेसची प्राधान्य व लॉक केलेले पूर्ण भरून केलेले अर्ज विचारात घेतले जातील.
राज्यात मुंबई, नाशिक, अमरावती, नागपूर महापालिका क्षेत्रासह पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अकरावीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाइन पद्धतीने होतात. इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंदणी अर्थात अर्जाचा पहिला भाग भरण्याची सुविधा ३० मे पासून उपलब्ध करून देण्यात आली होती, तर भाग दोन अर्थात कॉलेजेसच्या पसंतीक्रमाच्या नोंदणीची प्रक्रिया २२ जुलैपासून सुरू झाली.
सीबीएसई आणि आयएससी निकालांच्या प्रतीक्षेत असलेल्या जय हिंद कॉलेजने काल, सोमवारी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर केले. महाविद्यालय 27 जुलै रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत अर्ज मागवेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करेल. ही प्रक्रिया 6 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे. सेंट झेवियर्स कॉलेजनेही आपल्या पोर्टलवर टाइम टेबल टाकले आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना 28 जुलैपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्यास सांगण्यात आले आहे. महाविद्यालयातील पहिली गुणवत्ता यादी 30 जुलै रोजी जाहीर होणार आहे. कॉलेजमधील प्रवेश प्रक्रिया ५ ऑगस्टला पूर्ण होण्याची शक्यता आहे. एनएम आणि मिठीबाई कॉलेज 27 जुलै रोजी बीए, बीकॉम आणि बीएससीसाठी पहिली गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणार आहेत. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांसाठी त्यांचे प्रवेश सुरू आहेत.
कोटा प्रवेशाची अंतिम तारीख ३० जुलै
11वी प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याकांना संस्थेत विविध कोट्यांतर्गत प्रवेश दिला जातो. कोट्याअंतर्गत प्राधान्याने प्रवेश नोंदणी करण्यासाठी २७ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी 28 जुलै रोजी नियमानुसार जाहीर होणार आहे. ही यादी जाहीर झाल्यानंतर कोट्यातून प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी 28 ते 30 जुलै या कालावधीत महाविद्यालयात जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा.
प्रक्रिया खालीलप्रमाणे…
*प्रवेशासाठी पसंतीक्रम नोंदणी, अर्जाचा भाग दोन भरणे – 27 जुलैपर्यंत
*तात्पुरती गुणवत्ता यादी- 28 जुलै
*गुणवत्ता यादीवर आक्षेप, हरकती नोंदवणे – 28 ते 30 जुलै
*पहिल्या नियमित फेरीची प्रवेश यादी – ३ ऑगस्ट (सकाळी १०)
*महाविद्यालयातील प्रवेशाची पुष्टी, प्रवेश रद्द करणे, प्रवेश नाकारणे – 3 ते 6 ऑगस्ट
- दुसऱ्या नियमित फेरीसाठी रिक्त पदांची घोषणा – ७ ऑगस्ट
*दुसरी प्रवेश फेरी – ७ ते १७ ऑगस्ट
*तिसरी प्रवेश फेरी – १८ ते २५ ऑगस्ट
*विशेष प्रवेश फेरी – २६ ऑगस्ट ते ३ सप्टेंबर