डोंबिवली ( शंकर जाधव ) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्सच्या वतीने किन्नरांसाठी कल्याण येथील किन्नर अस्मिता गरिमा गृह, हाजीमलंग रोड येथे आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. शिबिरात सुमारे १०० किन्नरांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यामध्ये डोळे, दात, रक्त, रक्तदाब व साधारण आरोग्य तपासण्यात आले. तसेच ज्यांना गरज असेल त्यांचे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व दातांचे उपचार करण्यात येणार आहेत असे क्लबचे अध्यक्ष रो. संजय कागदे ह्यांनी सांगितले.
आरोग्य शिबिरास इंडियन डेंटल असोसिएशन, सोशल सर्विस लीग आय हॉस्पिटल कल्याण, जे बी फार्मा, डॉ. सुनीता पाटील, डॉ. वंदना धाकतोडे इत्यादीचे विशेष सहकार्य लाभले. सदर उपक्रमाच्या प्रमुख रो. मालिनी नाडकर्णी होत्या. रोटरी क्लब ऑफ डोंबिवली डायमंड्स तर्फे किन्नर अस्मिता गरिमा गृहास एक संगणक भेट देण्यात आला. त्याचा उपयोग त्यांना संगणक कोर्सेस शिकण्यास व वर्क फ्रॉम होम असे काम करून स्वावलंबी होण्यास होणार आहे. सदर उपक्रमाचे प्रमुख रो. केयूर शहा होते. वैद्यकीय शिबीर व संगणक भेट दिल्या बद्दल किन्नर अस्मिता गरिमा गृहाच्या प्रमुख नीता केणे गुरुजी ह्यांनी क्लबचे अध्यक्ष रो. संजय कागदे व इतर सदस्यांचे आभार मानले.


सदर कार्यक्रमांस क्लबचे अध्यक्ष रो. संजय कागदे, उपक्रम प्रमुख रो. मालिनी नाडकर्णी व रो. केयूर शहा, रो. जगदीश नाडकर्णी, रो. निलेश गोखले, रो. सुदीप साळवी, रो. डॉ. वंदना धाकतोडे, डॉ. सुनीता पाटील, डॉ. राहुल थानवी, डॉ. सुमित फिरके, डॉ. ललित पाटील, डॉ कामेध चौधरी, डॉ. राजीव ब्राम्हणे, मनीषा भावे, जे बी फार्माचे गोपाळ शेनॉय व इतर उपस्थित होते.