मुंबई :
सध्या वाढत्या उन्हाने नागरिकांचे जगणे मुश्किल झाले आहे. मात्र उन्हामध्ये बराचवेळ राहिल्याने शरीरातील तापमान नियंत्रित करण्याच्या यंत्रणेत बिघाड होऊन उष्माघाताचा होतो. उन्हामुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होते. त्यामुळे निर्जलीकरण होऊन उष्माघात होत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
उष्माघाताचा त्रास साधारणपणे दोन प्रकाराने होतो. परिश्रम नसलेला उष्माघात आणि परिश्रमात्मक उष्माघात असे दोन प्रकार असतात. पहिल्या प्रकाराचा त्रास हा बाहेेरील तापमान वाढल्याने होतो. तर दुसऱ्या प्रकारामध्ये शरीरातील तापमान वाढल्याने होतो. परिश्रम नसलेल्या उष्माघातामध्ये बाहेरील तापमान वाढल्यावर शरीरातील तापमान नियंत्रित करण्याची यंत्रणा कार्यान्वित होते. ही यंत्रणा शरीरातील घाम बाहेर टाकून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्याचे कार्य करते. मात्र ठरावीक वेळेनंतर शरीरातील तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे जाते, अशावेळी शरीराचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा ठप्प होते. यंत्रणा ठप्प झाल्याने श्वसनाचा त्रास सुरू होतो, रक्तदाब कमी होतो, उलटी व चक्कर येण्यास सुरुवात होते. नागरिकांना अस्वस्थ वाटू लागते. तो चक्कर येऊन खाली पडतो. अशी लक्षणे दिसून येतात. तसेच शरीरातील मेंदू, मूत्रपिंड, हृदय असे अवयव बाधित होण्यास सुरुवात होते. तर परिश्रमात्मक उष्माघातामध्ये बाहेरचे तापमान कमी असते. परंतु व्यक्ती दूरचा प्रवास करत असेल किंवा व्यायाम करत असेल, अशावेळी बाहेरील तापमान कमी असले तरी शरीरातील तापमान वाढते. दोन्ही तापमानाचा फरक शरीरावर होऊन उष्माघाताचा त्रास होतो, अशी माहिती इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिनचे मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिली.
उष्माघाताचा त्रास झाल्यास काय करावे
एखाद्या व्यक्तीला उष्माघाताचा त्रास होत होऊन तो अस्वस्थ झाला असेल, त्याला चक्कर येऊन तो खाली पडला असेल, अशावेळी त्या व्यक्तीच्या तोंडावर व डोक्यावर पाणी मारावे. एखादा कपडा पाण्यामध्ये भिजवून तो त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती गुंडाळावा आणि त्याला तातडीने डॉक्टरांकडे न्यावे, अशाप्रमारे बाह्यपद्धतीने व्यक्तीच्या शरीराचे तापमान थंड केल्यास त्याचे चांगले परिणाम दिसून येतात. मात्र तसे न करता थेट डॉक्टरकडे नेल्यास तोपर्यंत शरीरातील काही अवयव बाधित होण्याची शक्यता असते, अशी माहिती डॉ. भरत जगियासी यांनी दिली.
वृद्धांना अधिक त्रास होण्याची शक्यता
तरुणांपेक्षा वयोवृद्धांना उष्माघाताचा त्रास अधिक होतो. वयोवृद्ध व्यक्ती आणि जे रक्तदाब, मधुमेह यासारख्या सहआजारांनी त्रस्त असतात. त्यांना उन्हामध्ये थोडावेळ तरी राहिले तरी लगेचच त्रास होतो. त्यामुळे वयोवृद्ध व सहव्याधी असलेल्या नागरिकांनी सकाळी ११ ते दुपारी ४ दरम्यान घरातून बाहेर पडू नये.