बॉलिवूडमध्ये अशा काही अभिनेत्री आहेत ज्यांनी काही काळ चाहत्यांच्या मनावर चांगलंच राज्य केले. पण नंतर त्यांच्या यशस्वी कारकिर्दीला उतरती कळा लागली. आणि अशा अभिनेत्रींना बॉलिवूडमधून माघार घ्यावी लागली. अशीच एक अभिनेत्री म्हणजे ममता कुलकर्णी. ममता कुलकर्णी इतकी लोकप्रिय होती की तिचे मंदिरही बांधले गेले.
ममता कुलकर्णी यांचा जन्म 20 एप्रिल 1972 रोजी मुंबईतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. एके दिवशी ममताच्या आईने वर्तमानपत्रात एक जाहिरात पाहिली, ज्यामध्ये एक मॉडेलिंग एजन्सी नवीन चेहरे शोधत असल्याचे सांगितले होते. ममता त्यावेळी शाळेत होती. ममता घरी येताच आईने विचारले तुला मॉडेल करायचे आहे का? ममता तिच्या आईच्या प्रश्नाचे उत्तर देण्यास खूपच लहान होती, पण तिने होकार दिला.
मग लगेच आई म्हणाली, ठीक आहे संध्याकाळी तयार हो आपण एका ऍड एजन्सी मध्ये जाणार आहोत. ममता त्या एजन्सीमध्ये पोहोचली आणि तिला सतत मॉडेलिंगच्या ऑफर्स मिळू लागल्या. अशा प्रकारे ममताच्या आईच्या पाठिंब्यामुळे ती मॉडेलिंग आणि नंतर अभिनयात येऊ शकली. पुढे ममताच्या अभिनयाची गाडी सुरळीत सुरू झाली. ममता आवारा (1993), करण अर्जुन (1995), सबसे बडा खिलाडी (1995), आंदोलन (1995), बाजी (1996), चायना गेट (1998) यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये दिसली.
हैदराबादमध्ये एका चाहत्याने बांधले मंदिर
1992 मध्ये, ममता प्रेम शिकारम या चित्रपटात दिसली, ज्याने बॉक्स ऑफिसचे सर्व रेकॉर्ड तोडले. दक्षिणेत ममताची फॅन फॉलोइंग इतकी वाढली की तिच्या एका चाहत्याने हैदराबादमध्ये तिच्यासाठी मंदिर बांधले.
ममताला दक्षिणेतून चाहत्यांकडून अनेक संदेश
चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ममताला दक्षिणेतून चाहत्यांकडून अनेक संदेश येत असत. ही माहिती मिळताच ममता म्हणाली, मला याची कधीच अपेक्षा नव्हती. नेल्लोरमधून गेल्यास मी त्या मंदिराला नक्कीच भेट देईन. स्वतःचे मंदिर अशाप्रकारे बांधल्याचे कळल्यावर ममता यांना खूप आनंद झाला.