ट्विटर वापरकर्त्यांसाठी ही मोठी बातमी आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने लेगसी व्हेरिफाईड अकाउंट्सवरून ब्लू टिक काढून टाकले आहे. गुरुवारी मध्यरात्रीपासून व्हेरिफाईड अकाऊंटमधून फ्री ब्लू टिक्स काढण्यास सुरुवात झाली आहे. ज्या वापरकर्त्यांनी या सेवेसाठी पैसे दिले नाहीत त्यांच्या खात्यातून ब्लू टिक्स काढण्यात आल्या आहेत. याचा फटका राजकीय नेत्यांसह अनेक सेलिब्रिटींना बसला आहे.
दरम्यान, ट्विटर विकत घेतल्यानंतर एलोन मस्क यांनी ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागतील, असे जाहीर केले होते. ज्या अकाऊंटधारकांनी पेड सबस्क्रिप्शन घेतलेलं नाही, त्यांच्या अकाऊंटवरून ब्ल्यू टिक काढणार असल्याचं जाहीर करत यासाठी युजर्सला 20 एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली होती. ही मुदत गुरुवारी मध्यरात्री संपली.
त्यानंतर ट्विटरने ब्लू टिक्स काढण्यास सुरुवात केली. यामुळे अनेक व्हेरिफाईड युजर्सचे ब्लू टिक्स आता बंद झाले आहेत. क्रिकेटपटू विराट कोहली, एम. एस. धोनी, सचिन तेंडुलकर, फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो, सुपरस्टार अमिताभ बच्चन, अभिनेता सलमान खान, शाहरुख खान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांच्या निळ्या टिक्स काढून घेतल्या आहेत. तसेच, जर एखाद्या व्यक्तीला ब्लू टिक हवी असेल तर त्याला ट्विटरसाठी पैसे द्यावे लागतील. ज्या व्यक्ती किंवा संस्था पैसे देतील त्यांनाच ट्विटर ब्लू टिक दिली जाईल. ट्विटरने 2009 मध्ये ब्लू टिक देण्यास सुरुवात केली.