उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथील लुलू मॉल (Lulu Mall) सध्या चर्चेचा विषय बनला आहे. आदित्यनाथ योगी (Adityanath Yogi) यांनी या मॉलचे उदघाटन केले आहे. योगींचा मॉलचे मालक युसुफ अली यांच्यासोबत फोटो ही वायरल झाला आहे. आता याच मॉलवर जिहादी गटाशी संबंध असल्याचा व जिहादला पाठिंबा असल्याचा आरोप करण्यात आला आहे. लुलू मॉलमध्ये ७-८ जण नमाज अदा करत असल्याचा व्हिडिओ प्रचंड वायरल (Viral video) झाला. या व्हिडिओ वरूनच या वादाला सुरुवात झाली.
सोशल मीडियावर सध्या लुलू मॉलवरून चांगलीच चर्चा होत आहे. मॉलमध्ये कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाची परवानगी कशी काय दिली गेली,असा प्रश्न विचारला जात आहे. परंतु मॉलच्या प्रशासनाकडून कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला चालना दिली जात नाही असे सांगितले आहे.
‘लुलू मॉल सर्व धर्मांचा आदर करतो. आम्हाला येथे कोणत्याही प्रकारचा धार्मिक मेळावा किंवा प्रार्थना करण्याची परवानगी नाही. आम्ही कर्मचारी व सुरक्षा कर्मचाऱ्यांना अशी घटना घडू देऊ नये,अशा सूचना दिल्या आहेत. आम्हाला हा मॉल जागतिक दर्जाचा बनवायचा आहे. त्यासाठी सहकार्य करावे.’ अशी विनंती लुलू मॉलने आपल्या अधिकृत निवेदनात केली आहे. युसुफ अली यांनी २००० साली आखाती देशांत लुलू हायपरमार्केट ग्रुपची स्थापना केली. त्यांनी तयार केलेल्या सर्व मॉलला लुलू नाव देण्यात आले. अरबी भाषेत लुलू चा अर्थ मोती असा होतो.
वायरल व्हिडिओ फक्त हे मॉलचे वादाचे कारण नाही तर प्रशासनावर फक्त मुस्लिम लोकांनाच नोकऱ्या दिल्या गेल्या असाही आरोप होत आहे. उजव्या विचारसरणीच्या संघटना आणि अखिल भारतीय हिंदू महासभेच्या काही सदस्यांनी लुलू मॉल च्या गेटवर आंदोलन देखील केले होते. मॉलमधील ७० टक्के पुरुष कर्मचारी मुस्लिम आहेत व ३० टक्के महिला कर्मचारी हिंदू समुदायातील आहे. असे करून लुलू मॉलचे व्यवस्थापक जिहादला पाठिंबा देतात असा आरोप शिशिर चतुर्वेदी आणि संघटनेच्या इतर लोकांनी केला आहे.