खरंतर महाराष्ट्राला (Maharashtra) सणांचा (Festivals) खूप मोठा वारसा लाभला आहे. अगदी दणक्यात साजरा करता येण्यासारखे सण म्हणजे दहीहंडी (Dahihandi), गणपती (Ganpati) याची तर लोक आवर्जून वाट पाहत असतात. परंतु कोरोना (Corona) महामारीमुळे गेल्या २ अडीच वर्षात अनेक सणांवर निर्बंध घालण्यात आले होते. परंतु एक आनंदाची बाब म्हणजे या वर्षी कोणत्याही सणांवर कसलाही निर्बंध घातला जाणार नाही. विशेष म्हणजे गणपती आणि दहीहंडी या दोन्ही महत्वाच्या सणांना निर्बंध नसेल. तसेच यासंदर्भात एक महत्वाची तातडीची बैठक घेऊन या काळात एसटीच्या जास्त गाड्या सोडण्याचे नियोजन करण्याचे आदेश परिवहन खात्याला देण्यात आले आहेत. त्यामुळे विशेषतः गणपतीला गावी जाणायेणाऱ्यांची काळजी कमी झाली आहे.
मागचा काही काळ कायदा आणि सुव्यवस्थेचे भान राखून सण साजरे करण्याचे निर्देश जारी करण्यात आले होते. जिल्हा प्रशासनालाही सूचना दिल्या होत्या. सर्व सण सुरळीत पार पाडण्यासाठी विशेषतः गणपती आगमन आणि विसर्जन मार्गावरील खड्डे वेळीच दुरुस्त करण्याच्या सूचना सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मंडप आणि इतर गोष्टींकरता परवानग्या सुटसुटीत झाल्या पाहिजेत लोकांना सारखे यायला लागू नये यासाठी एक खिडकी योजना आणि ऑनलाईन परवानग्या दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आली आहे.
ह्या मंडळांना कोणत्याही प्रकारचं नोंदणी शुल्क भरावे लागणार नाहीत याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यांना शुल्कातून सूट दिली आहे. मंडपाच्या दरातून सवलत दिली आहे. तसेच मंडळांकडून जे हमी पत्र घेत होते, ते घेण्यासदेखील मनाई करण्यात आली आहे. अनेक वर्षांपासून गणेशोत्सव साजरे करणाऱ्यांकडून हमी पत्र घेऊ नका असे सांगितले आहे. नियमांचे पालन करणे गरजेचे आहे परंतु त्याची अतिशयोक्ती करू नये असे सांगण्यात आले आहे. मुंबईच्या नियमावलीनुसारच नियमावली लागू करण्याच्या सूचना केल्या आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूर्त्यांच्या ऊंचीवर ज्या मर्यादा होत्या त्या देखील काढून टाकण्यात आल्या आहेत. अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मिळाली.